|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हळदीचे नेरुर केंद्रावरील 110 दूरध्वनी बंद

हळदीचे नेरुर केंद्रावरील 110 दूरध्वनी बंद 

शिष्टमंडळाने गाठले कुडाळचे बीएसएनएल कार्यालय

लाईनमनची बदली करा अन्यथा केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा

वार्ताहर / कुडाळ:

 हळदीचे नेरुर टेलिफोन केंद्रावरील लाईनमनच्या मनमानी कारभाराला ग्राहक कंटाळले आहेत. त्यांच्याकडून काम होत नसल्याने 160 पेकी 110 टेलिफोन बंद आहेत. याकडे लक्ष वेधूनही आवश्यक कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे त्या लाईनमनची 31 ऑक्टोबरपर्यंत अन्यत्र बदली करावी. अन्यथा 3 नोव्हेंबर रोजी तेथील टेलिफोन केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा टाळंबा धरणग्रस्त पुनर्वसन कृती समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी कुडाळ बीएसएनएलचे कनिष्ठ अभियंता ए. जी. कोकाटे यांना दिला आहे.

 तेथील टेलिफोन केंद्रावर लाईनमन म्हणून मयेकर कार्यरत आहेत. त्यांच्याकडून ग्राहकांना व्यवस्थित सेवा मिळत नाही. त्यांची अन्यत्र बदली करावी. तसेच अन्य प्रश्नांबाबत 2013 पासून बीएसएनएल विभागाकडे निवेदनाद्वारे वारंवार पाठपुरावा सुरू होता. पण अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त ग्राहकांनी शिष्टमंडळाच्या नेतृत्वाखाली आज येथील बीएसएनएल विभागाच्या कार्यालयावर धडक मारली. याबाबत तेथील अधिकाऱयांना जाब विचारला. कनिष्ठ अभियंता  कोकाटे यांना निवेदन सादर करून विविध समस्यांबाबत त्यांचे लक्ष वेधले.

 मयेकर यांच्याकडून ग्राहकांना चांगली सेवा मिळत नाही. ते ग्राहकांना उद्धट   उतरे देतात. त्यांच्या मनमानीबाबत तक्रार देऊनही अद्याप कार्यवाही झाली नाही. वसोली-उपवडे ग्रुप ग्रामपंचायतीमधील टेलिफोन व इंटरनेट सेवा जूनपासून बंद आहे. त्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. तसेच या भागातील टेलिफोन सेवाही बंद आहे, याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधत अन्य लाईनमनची तेथे नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

 शिष्टमंडळात टाळंबा धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष बाळा सावंत, सचिव-चंद्रकांत सावंत, वसोली सरपंच नयना शेडगे, उपसरपंच मनोहर दळवी, पोलीस पाटील जिजानंद शेडगे, सुधीर गुंजाळ, दत्ताराम गुंजाळ, वनिता सावंत आदी उपस्थित होते.

Related posts: