|Sunday, July 21, 2019
You are here: Home » क्रिडा » रोनाल्डो वर्षातील सर्वोत्तम खेळाडू

रोनाल्डो वर्षातील सर्वोत्तम खेळाडू 

फिफा पुरस्कार : मेस्सी, नेमारला संयुक्त दुसरे स्थान

वृत्तसंस्था/ लंडन

रिअल माद्रिद क्लबकडून खेळणारा पोर्तुगालचा स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डोला फिफाने वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. रिअल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांना वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. फिफाचा हा वार्षिक पुरस्कार सोहळा लंडनमध्ये सोमवारी रात्री झाला. रोनाल्डोला सलग दुसऱयांदा हा पुरस्कार मिळाला आहे.

यावषी ला लिगा व चॅम्पियन्स लीग अशी दोन अजिंक्मयपदे रोनाल्डोने रिअल माद्रिदकडून खेळताना मिळविले. युरोपियन चषकाच्या अंतिम लढतीत त्याने युवेंटसविरुद्ध दोन गोल नोंदवल्याने रिअलला स्वतःकडेच जेतेपद राखता आले अणि असा पराक्रम करणारा पहिला संघ होण्याचा मानही मिळविला. बॅलन डीओर पुरस्कार पाच वेळा मिळविणाऱया बार्सिलोनाचा लायोनेल मेस्सी व पॅरिस सेंट जर्मेनचा ब्राझिलियन आघाडीवीर नेमार यांना संयुक्त दुसरे स्थान मिळाले. या पुरस्कारांसाठी राष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक व कर्णधार तसेच प्रसारमाध्यमे व चाहते यांचे मतदान घेण्यात आले होते.

रिअल माद्रिदचे फ्रेंच प्रशिक्षक झिदान यांना वर्षातील सर्वोत्तम मॅनेजरचा पुरस्कार देण्यात आला. रिअलच्या यशात त्यांची भूमिकाही मोलाची ठरली आहे. वर्षातील सर्वोत्तम संघही फिफाने निवडला असून त्यात रिअलच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. त्यात मार्सेलो, सर्जिओ रॅमोस, लुका मोडरिक, टोनी क्रूस व रोनाल्डो यांना स्थान मिळाले. याशिवाय मेस्सी, नेमार, युवेंटसचा जियानलुइजी बुफॉन, डॅनी अल्वेस, लिआनार्दो बोनुसी, आंदेस इनेस्टा यांचीही या संघात निवड झाली आहे. अर्सेनलच्या ऑलिव्हियर गिरोडला वर्षातील सर्वोत्तम गोलचा पुस्कास पुरस्कार तर बुफॉनला वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार देण्यात आला. महिलांमध्ये हॉलंडच्या लीएक मार्टेन्सला वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा बहुमान मिळाला तर हॉलंडच्या राष्ट्रीय महिला संघाच्या प्रशिक्षिका सरिना वीगमन यांची सर्वोत्तम महिला मॅनेजर म्हणून निवड झाली. युरो 2017 मध्ये त्यांच्या संघाचे जेतेपद मिळविले आहे.