|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करणे गरजेचे

दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करणे गरजेचे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   महापालिकेची शहर व उपनगरामध्ये 56 उद्याने आहेत. यातील काही उद्यानामध्ये महाराष्ट्रातील अतिशय दुर्मिळ वनस्पतींचा समावेश आहे. येथील रत्नगुंज या जातीची फक्त दोनच झाडे असून महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर शहरात उपलब्ध आहेत. अशा वनस्पतीचे संवर्धन करणे गरजेचे असल्याची सूचना वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. मधुकर बाचुळकर यांनी केली.

   कोल्हापूर महापालिका कार्यकक्षेअंतर्गत जैव विविधता समितीची दूसरी बैठक मंगळवारी (दि.24) झाली. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती ताराराणी सभागृहात ही बैठक झाली.

 वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. बाचुळकर म्हाणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिह्यांत वनस्पती संपदा आहे. नागरिकांमध्ये जैव विविधता समितीसंदर्भात जागरुकता करणे गरजेचे असल्याचे सांगितले. निसर्ग मित्र अनिल चौगुले म्हणाले, शहरी भागात मधमाश्यांचे पोळे अहिंसक पद्धतीने काढता येणे शक्य आहे. याकरिता वर्धा येथील खादी ग्रामोद्योग मंडळाकडून तयार करण्यात आलेला पोशाख अग्निग्नशमन दलामध्ये समावेश करावा.

उदय गायकवाड यांनी महापालिकेत जैव विविधता समितीकरिता स्वतंत्र खाते निर्माण करणे आवश्यक असल्याचे सुचित केले. टाऊन हॉल परिसरात वटवाघुळांची एकूण संख्या पाहता सदरचा परिसराचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले, मत्स विभागाच्या अमिता कोळेकर, कृषी महाविद्यालयाचे डॉ.ए.जी.भोईटे, वनक्षेत्रपाल आर.एस.परदेशी, पशुधन विकास अधिकारी डॉ.एस.ए.बांदेकर, मच्छीमार प्रतिनिधी अमर जाधव, सहायक पर्यावरण अभियंता आर.के.जाधव, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, बागा अधीक्षक प्रभाकर कांबळे, प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी बाळासाहेब कांबळे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

       दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी केएमटी बसची सोय

 शहरात 350 दुर्मिळ वृक्षांची पाहणी करण्याकरिता आठवडयातून एकदा केएमटीची बस अल्पदरात उपलब्ध करुन दिल्यास पर्यटनास चालना मिळेल, असे निसर्गमित्र चौगुले यांनी सांगितले. यावर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शहरातील दुर्मिळ वृक्षांच्या पाहणीसाठी पर्यटकांना विशेष केएमटी बसची सुविधा सुरु करू, अशी ग्वाही दिली.

   वनस्पतींसाठी सरंक्षित क्षेत्र निर्माण करा    

  गावपातळीप्रमाणेच शहरी भागातही बी-बीयाणे, किटक, पशु, पक्षी, वने यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे  प्रा.ए.डी.जाधव यांनी सांगितले. तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी संरक्षीत ठिकाणे आरक्षित करुन पशु, पक्षी, विविध वनस्पती यांची प्रजाती निर्माण करता येतील असे सांगितले. यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेता येईल. महापालिकेच्या उद्यानामध्ये विशिष्ठ संरक्षित क्षेत्र निर्माण करुन त्यांचे संगोपन करता येईल. शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये सद्यस्थितीत असणारी मोरांची संख्या पाहता सदरील क्षेत्र हे मोरांसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करता येईल अशाही सुचना केल्या.

 हुतात्मा पार्क येथे बटरफ्लाय झोन

   वनस्पती संवर्धन कामांसाठी स्वतंत्र बजेटहेड निर्माण करण्यात येईल. लोक जैवविविधता नोंदवही तयार केली जाईल. हेरिटेज साईटस् निर्माण करुन त्याचा संवर्धनासाठी डीपीआर तयार करण्यात येईल. शाळांमध्ये जैव विविधता विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवणे व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. हुतात्मा उद्यान येथे बटरफलाय झोन करू, तसेच मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी अग्निग्नशमन जवानांना विशिष्ट पोशाख किट उपलब्ध करुन घेऊ असेही आयुक्तांनी सांगितले.

Related posts: