|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणे हटविण्याची कारवाई

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणे हटविण्याची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनाची तयारी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने चालविली आहे. या अंतर्गत बैठकांचे सत्र आणि पाहणी दौरेही सुरू आहेत. तसेच मंत्रीमहोदय शहरात दाखल होणार असल्याने सुशोभीकरणाचा आभास निर्माण करण्यासाठी विविध रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि फुटपाथवर थाटण्यात आलेली दुकाने हटविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मंगळवारी आरपीडी कॉर्नर ते पिरनवाडी क्रॉसपर्यंत मोहीम राबविण्यात आली.

खानापूर रोडचे रुंदीकरण झाल्यानंतर याठिकाणी फेरीवाले, फळ विपेत्यांनी  अतिक्रमण करून ठाण मांडले आहे. त्याचप्रमाणे विविध मॉलमध्ये येणाऱया ग्राहकांसाठी खानापूर रोड पार्किंगतळ बनला आहे. यामुळे येथील अतिक्रमणे हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे उद्यमबाग येथील उद्योजकांनी केली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. पण दि. 13 नोव्हेंबरपासून होणाऱया हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर रोड येथील अतिक्रमणे व फळविपेत्यांना हटविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी आरपीडी कॉर्नर येथून मोहिमेस सुरूवात करण्यात आली. पिरनवाडी क्रॉसपर्यंत असलेली खोकी, फळ विपेते, फेरीवाले आणि पार्क करण्यात आलेली वाहने हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी काही फळ विपेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधाला न जुमानता ही कारवाई करण्यात आली. यामुळे खानापूर रोडने मोकळा श्वास घेतला असून, वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कारवाईवेळी महसूल निरीक्षक सी. आय. बी. पाटील, मल्लिकार्जुन गुंडप्पण्णावर व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. 

अधिवेशनासाठी मंत्रीमंडळासह आमदार व अधिकाऱयांचा ताफा शहरात दाखल होणार आहे. बेळगाव शहर सुंदर असल्याचे दाखविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवून आटापिटा चालविला आहे. मंत्रीमहोदय विमानाने येत असल्याने सांबरा विमानतळ ते राणी चन्नम्मा चौकपर्यंतच्या रस्त्याशेजारील खोकी हटविण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. सांबरा रोड, जेएनएमसी रोड, गांधीनगर, संकम हॉटेल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन ते कोल्हापूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून घेण्यासाठी खोकेधारक, फळ विपेते आणि फेरीवाल्यांना सूचना देण्यात येत आहेत. दोन दिवसात अतिक्रमणे हटवून घ्यावीत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्यावतीने देण्यात आला आहे. महसूल निरीक्षक अनिल बिर्जे, शेखर पुजारी आदींसह अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

Related posts: