|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरातचा बिगूल वाजला

गुजरातचा बिगूल वाजला 

विधानसभा निवडणूक : 9 आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान : 18 डिसेंबरला मतमोजणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अखेर निवडणूक आयोगाने बुधवारी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजवत निवडणूक तारखांची घोषणा केली. 9 आणि 14 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे. या निवडणुकीत मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे.

गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 22 जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अचलकुमार जोती यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीसाठी बुधवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. गुजरात विधानसभेत 182 जागा असून पहिल्या टप्प्यात 89 जागांवर 9 डिसेंबर रोजी मतदान होईल. यामध्ये 19 जिल्हय़ांचा समावेश आहे. दुसऱया टप्प्यात 93 जागांवर 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून यात 14 जिल्हय़ांचा समावेश आहे.

9 डिसेंबरला होणाऱया पहिल्या टप्प्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 22 नोव्हेंबरला दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जाईल. 24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 14 डिसेंबरला होणाऱया दुसऱया टप्प्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 28 नोव्हेंबरला अर्जांची छाननी केली जाईल. 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

मतदान केंद्रांची धुरा महिला अधिकाऱयांकडे

हिमाचल प्रदेशप्रमाणेच गुजरातमध्येही सर्व 182 मतदारसंघांमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून महिला काम पाहतील, असेही निवडणूक आयुक्त जोती यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक उमेदवाराला प्रचारावर 28 लाख रुपयांपर्यंतच खर्च करता येतील, असेही त्यांनी जाहीर केले. या निवडणुकीत 50 हजार 128 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 4 कोटी 33 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

निवडणूक आयोगाने पंधरवडय़ापूर्वी म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नव्हता. केंद्र सरकारच्या दबावामुळे आयोगाने कार्यक्रम जाहीर केला नाही, अशी टीकाही निवडणूक आयोगावर झाली होती.

भाजप-काँग्रेसमध्येच खरी लढाई

यंदाच्या निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात निवडणूक होणार असल्याने भाजपसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये भाजपला धूळ चारण्याचे मनसुबे काँग्रेसने रचले आहेत. गेल्या महिन्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या दोघांचेही गुजरात दौरे वाढल्याचे दिसून येत आहेत. या दोन्ही नेत्यांनी आतापासूनच एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे.

प्रादेशिक युवा नेत्यांची भूमिकाही निर्णायक

गुजरातमध्ये 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 115 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने 61 तर अन्य पक्षांनी केवळ 6 जागा जिंकल्या होत्या. भाजपची सत्ता कायम राहिल्यानंतर नरेंद्र मोदी हेच पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते. मात्र सध्या गुजरातमध्ये परिस्थिती बदलली असून पाटीदार समाज सरकारवर नाराज आहे. पाटीदार समाजातील नेते हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक भाजपसाठी अग्निग्नपरीक्षा ठरणार आहे. मात्र, 1998, 2002, 2007, 2012 अशा यापूर्वी झालेल्या निवडणुका भाजपने जिंकलेल्या असल्यामुळे यावेळीही भाजपच्या हातीच सत्ता राहील असा दावा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील सर्व 26 जागांवर विजय संपादन केला होता.

Related posts: