|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापालिकेची परिवहन बससेवा आज बंद

महापालिकेची परिवहन बससेवा आज बंद 

प्रतिनिधी/ सोलापूर

विविध मागण्यांसाठी मनपा परिवहनच्या कामगारांनी सुरु केलेल्या चक्री उपोषणाचा आज पाचवा दिवस असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, 26 ऑक्टोबर रोजी शहरातील परिवहन बससेवा एक दिवस लाक्षणिक बंद ठेवण्याचा निर्णय कामगार संघटनेने घेतला असल्याचे कामगार नेते अशोक जानराव यांनी सांगितले.

महापालिकेचा उपक्रम असलेल्या परिवहन कामगारांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान, ऍडव्हान्स तर मिळालाच नाही पण गेल्या काही महिन्यांपासून पगारही मिळत नाही. कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याने कामगारांनी गेल्या पाच दिवसांपासून सातरस्ता परिवहन बस डेपोसमोर चक्री उपोषण सुरु केले आहे. कामगारांच्या चक्री उपोषणाला पाच दिवस झाल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून काहीच दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांनी गुरुवारी एक दिवस बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात सध्या धावत असलेल्या सर्व 50 बसेस बंद राहणार आहेत. बससेवा बंद झाल्यास सोलापूरकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच सहाआसनी व तीन आसनी रिक्शावाल्यांची मनमानी प्रवाशांना सहन करावी लागणार आहे. महापालिका आयुक्तांनी परिवहन कामगारांच्या वेतनाला पालिकेकडून निधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन कामगारांनी वेतन व देखभाल दुरुस्तीपुरते उत्पन्न मिळवावे उर्वरित खर्चाचा भार पालिका प्रशासन उचलेल.

महापालिका परिवहन व्यवस्थापकपदी पालिकेचे सहायक आयुक्त अभिजित हराळे यांची नियुक्ती आयुक्तांनी केली आहे. हराळे यांनी परिवहनला उर्जितावस्था आणण्यासाठी कामगारांना विश्वासात घेण्याची गरज आहे. कामगारांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे गुरुवारी होणाऱया बससेवा बंदमुळे सोलापूरकरांचे हाल होणार हे मात्र नक्की आहे.

Related posts: