|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अपघातग्रस्त ‘जेट स्की’ अनधिकृत असल्याचे उघड

अपघातग्रस्त ‘जेट स्की’ अनधिकृत असल्याचे उघड 

प्रतिनिधी/ मालवण

  परवाना नसताना वेगाने व बेदरकारपणे देवबाग खाडीपात्रात जेट स्की चालवून दोन पर्यटकांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जेट स्की चालक मोतेस घाबू वरदेकर (रा. देवबाग) याच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वरदेकर हा चालवत असलेली जेट स्की अनधिकृत असल्याचे बंदर विभागाने बुधवारी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे जेट स्कीच्या मालकाला दंड करण्यात आला.

   मंगळवारी दुपारी देवबाग त्सुनामी आयर्लंड येथे साहसी जलक्रीडेचा आनंद लुट त असताना बनाना रायडवर बसलेल्या पुणे येथील यश सचिन माळवदे (12) व सचिन जयंत माळवदे (35) यांना मोतेस वरदेकर चालवित असलेल्या जेट स्कीची धडक बसली. यात दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, विनापरवाना असलेल्या जेट स्कीचे मालक रुक्मांगत रामचंद्र मुणगेकर यांना बंदर विभागाने दंड ठोठावला असून कारवाईचा प्रस्ताव प्रादेशिक बंदर विभागाकडे पाठविण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्रादेशिक बंदर अधिकारी अजित तोपणो यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नौकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू होती.

अपघातानंतर बंदर विभाग जागे 

तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पर्यटन दाखल येतात. त्यासाठी बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडून तपासणी केल्यानंतरच बोटींना परवानगी दिली जाते. मात्र, सद्यस्थितीत अनेक बोटी अनधिकृतपणे बंदरात व्यवसाय करीत असतात. तसेच स्पर्धात्मक चढाओढीमुळे क्षमतेपेक्षा जास्त बोटी खाडीत फिरत असतात. यावर बंदर विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस अनधिकृत व्यवसाय वाढू लागला होता. मंगळवारी झालेल्या अपघातानंतर बंदर विभाग जागे झाले आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी अजित तोपणो, बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, अमोल ताम्हणकर यांनी अपघातग्रस्त जेट स्कीची तपासणी केली असता त्या जेट स्कीचा परवाना व नौका नोंदणी प्रकिया करण्यात आली नसल्याने त्यांच्यावर दीड हजार रुपयांचा  दंड केला. देवबागसह किनारपट्टी भागात असलेल्या वॉटरस्पोर्टस् व त्यासाठी वापरण्यात येणाऱया नौकांची नोंदणी झाली आहे का? स्पीड बोट तसेच जेट स्कीचे चालक प्रशिक्षित आहेत का? बोटींवर बसणाऱया पर्यटकांची विमा प्रकिया पूर्ण झाली आहे का? यासह अन्य आवश्यक परवानग्याबाबत धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. परवाना नसलेल्या नौकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे बंदर विभागाने स्पष्ट केले.

पोलिसात तक्रार दाखल

 आपल्या ताब्यातील बनाना रायडवरुन घेऊन जाणाऱया सदाशिव रत्नदीप तारी यांनी बुधवारी सायंकाळी पोलिसात तक्रार दिली. बनाना रायडला परवाना उपलब्ध होता. तारी यांनी आपल्या तक्रारीत, आपण गेली चार वर्षे समीर सारंग यांच्या वॉटरस्पोर्टवर काम करतो. मंगळवारी बनाना राईडची बोट चालवत असताना मोतेस वरदेकर यांच्या जेट स्कीची धडक बनाना राईडला बसली व दोन पर्यटकांना गंभीर दुखापत झाली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या मोतेस याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

(बॉक्स वापरणे)

यशवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

 जेट स्कीची धडक बसल्याने यश माळवदे या बारा वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर मंगळवारी दुपारपासून गोवा येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याला दुसऱया खासगी रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यश याचे वडील सचिन यांच्याही पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर त्याच रुग्णालयात शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पुणे येथून माळवदे कुटुंबीय बुधवारी गोव्यात दाखल झाले.