|Friday, October 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘चला हवा येऊ द्या’ची लंडनवारी

‘चला हवा येऊ द्या’ची लंडनवारी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

युनायटेड किंगडम (यु के) मधील मराठी रसिकांसाठी भारतीय आणि खासकरून मराठी मनोरंजन विश्वातील विविध प्रयोग करण्यासाठी ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ ने पुढाकार घेतला असून, रविवार दि. 12 नोव्हेंबर रोजी ’चला हवा येऊ द्या’ टीम लंडनमध्ये खास शो करणार आहे.

लंडनमधील ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’चे संचालक अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी ही माहिती दिली.लंडनमध्ये ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये हा खास शो होत असून, ‘झी मराठी’ ची गाजलेली टीम तिथे शो साठी जात आहे.

अमोघ धामणकर आणि गंधार बाबरे या चित्रपटवेड्या दोन अभियंता मराठी तरुणांनी मनोरंजन विश्वातील चांगले प्रयोग, उपक्रम युनायटेड किंगडम वासियांना दाखवायच्या उद्देशाने ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ची स्थापना केली. 2016 मध्ये ‘एक अलबेला’ हा मराठी सिनेमा त्यांनी इंग्लंडमधील 25 ठिकाणी प्रदर्शित केला आाणि त्याचे 75 शो झाले. ‘ब्रिटिश फिल्म सर्टीफिकेशन बोर्ड’कडून प्रमाणित होऊन प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला! अशा तर्‍हेने ब्रिटिश टेरीटरी मराठी सिनेमाला ‘बाराखडी’च्या माध्यमातून खुली झाली.

नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांनी ‘लई बाराचे’ हा कार्यक्रम 4 ठिकाणी केला. त्यात कुशल बद्रीके, भाऊ कदम, मंगेश देसाई, संतोष जुवेकर, विजू माने यांचा समावेश होता. ‘स्ट्रगलर साला’ या कॉमेडी शो च्या चित्रीकरणात त्यांनी लंडनमध्ये मदत केली.

या पार्श्वभूमीवर ‘चला हवा येऊ द्या’ चा खास प्रयोग 12 नोव्हेंबरला ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये होत आहे. ‘चला हवा येऊ द्या’चे डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे हे कलावंत लंडनमधील शो मध्ये सहभागी होणार आहेत. ’ट्रॉक्सी’ हे प्रख्यात थिएटर असून, तेथे यापूर्वी डॅनी बॉयल (स्लम डॉग मिलेनियर), रिचर्ड ब्रॅनसन (व्हर्जिन ग्रुप) अशा दिग्गजांनी शो केले आहेत.

 

Related posts: