|Saturday, January 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » टिपूच्या गोंधळात भर सिद्धूनी केलेल्या मांसाहाराची!

टिपूच्या गोंधळात भर सिद्धूनी केलेल्या मांसाहाराची! 

10 नोव्हेंबर रोजी होणाऱया टिपू जयंतीला भाजपचा विरोध असतानाच राष्ट्रपतींच्या भाषणात टिपूचा गौरव झाला याचा भाजपला मोठा धक्का बसला आहे.  साहजिकच राष्ट्रपतींनी केलेला उल्लेख काँग्रेसजनांचा उत्साह वाढवणारा ठरला आहे. तर धर्मस्थळ मंजुनाथेश्वराच्या दर्शनाला जाताना सिद्धरामय्या यांनी मांसाहार केला होता यामुळे ते वादात अडकले आहेत.

 

कर्नाटक विधानसौधचा हीरक महोत्सव कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. कार्यक्रमासाठी 27 कोटींचा खर्च करण्याची तयारी ठेवून सचिवालयातील अधिकाऱयांनी प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावावर टीकेची झोड उठताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रस्तावाला हरकत घेत 27 कोटींचा खर्च 10 कोटींवर आणला होता. बुधवारी 25 ऑक्टोबर रोजी हीरक महोत्सवाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची या कार्यक्रमात खास उपस्थिती होती. कार्यक्रम थाटात झाला तरी अद्याप वाद काही संपेनात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करताना माजी मुख्यमंत्री व माजी प्रधानमंत्री एच.डी. देवेगौडा यांच्या नावाचा अनवधानाने उल्लेख केला नाही. राष्ट्रपतींचे भाषण सुरू असतानाच निजद आमदारांनी ही गोष्ट राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी सावरलेल्या राष्ट्रपतींनी देवेगौडा हे तर आपले चांगले मित्र आहेत, असे सांगत वेळ मारून नेली. कार्यक्रम आटोपून नवी दिल्लीला पोहोचल्यानंतर राष्ट्रपतींनी देवेगौडा यांच्याशी संपर्क साधला. केवळ अनवधानाने तुमचा उल्लेख राहून गेला याला अन्य कोणती कारणे नाहीत हे ठासून सांगितले. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनाही अपमानास्पद वागणूक देण्यात आली. सरकार आणि सचिवालय यांच्यात ताळमेळ नव्हता म्हणून असे प्रकार घडले. अनेक माजी मुख्यमंत्री हयात आहेत त्यांना या कार्यक्रमाला रीतसर आमंत्रण नव्हते. कार्यक्रमानंतर आता अजूनही याविषयीची चर्चा थांबली नाही. वादही संपलेला नाही.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात टिपू सुलतानचा गौरव केला. एकीकडे टिपू सुलतान जयंतीला विरोध होत असतानाच राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केलेल्या गौरवपूर्ण उल्लेखामुळे काँग्रेसजनांचा उत्साह वाढला आहे तर भाजप नेत्यांचा हिरमोड झाला आहे. टिपू सुलतान कन्नडविरोधी होता. हिंदू विरोधी होता म्हणून भाजपने टिपू जयंतीला विरोध केला आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्यासह अनेक नेत्यांनी तर टिपू सुलतान जयंतीच्या सरकारी कार्यक्रमात शिष्टाचार म्हणूनही आपले नाव घालू नका अशी सूचना केली आहे. सरकारी टिपू जयंतीला विरोध होत असतानाच आम्ही जयंती साजरी करणारच असा सरकारने चंग बांधला आहे. सहा महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आपली क्होट बँक अधिक भक्कम करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी हा मुद्दा प्रति÷sचा बनवला आहे. दोन वर्षांपूर्वी टिपू सुलतान जयंतीदिनी कोडगू जिल्हय़ात दंगल उसळली होती. कारण टिपू जयंतीला कुर्गींचा विरोध आहेच. हजारो कुर्गींची हत्या करणाऱया टिपू सुलतानची जयंती कशासाठी करायची हा त्यांचा प्रश्न आहे. टिपू एक शूर होता. इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढणाऱया टिपू सुलतानची जयंती का साजरी करू नये हा काँग्रेस नेत्यांचा प्रश्न आहे. 10 नोव्हेंबर रोजी टिपू जयंती होणार आहे. एकीकडे जयंतीला भाजपचा विरोध असतानाच राष्ट्रपतींच्या भाषणात टिपूचा गौरव झाला याचा भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर साहजिकच राष्ट्रपतींनी केलेला उल्लेख काँग्रेसजनांचा उत्साह वाढवणारा ठरला आहे.

टिपू सुलतान जयंतीवरून काँग्रेस सरकारवर टीका होत असतानाच मुख्यमंत्री  सिद्धरामय्यानी आणखी एक वाद आपल्या अंगावर ओढवून घेतला आहे. धर्मस्थळ मंजुनाथेश्वराच्या दर्शनाला जाताना सिद्धरामय्या यांनी मांसाहार केला होता. धर्मस्थळला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री मंगळूर दौऱयावर होते. मंगळूर म्हटले की, साहजिकच जेवणात मत्स्यखाद्य आलेच. मासा खाऊन मंजुनाथाच्या दर्शनाला गेलेले सिद्धरामय्या नव्या वादात अडकले आहेत.

धर्मस्थळचे धर्माधिकारी डॉ. विरेंद्र हेगडे  यांच्यावर वयाच्या 21 व्या वषी धर्माधिकारीपदाची जबाबदारी आली. ते धर्मस्थळचे धर्माधिकारी होऊन 50 वर्षे पूर्ण झाली म्हणून धर्मस्थळमध्ये सुवर्णमहोत्सव कार्यक्रम सुरू आहेत. 29 ऑक्टोबर रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मस्थळला येणार आहेत. नमोंच्या आधी धर्मस्थळला भेट देण्याची मुख्यमंत्र्यांना घाई होती. कारण सिद्धरामय्या आपण नास्तिक आहोत असे वारंवार सांगत असले तरी गृहप्रवेश करण्यापूर्वी त्यांनीही होम, हवन आणि धार्मिक विधी केलेले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आधी धर्मस्थळला पोहचण्याच्या घाईत मुख्यमंत्र्यांनी आपल्या अंगावर नवा वाद ओढवून घेतला आहे.

‘कोणी कोणता आहार घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मांसाहार करून देवदर्शन घेऊ नये असा नियम कोणी केला आहे’ असा प्रश्न उपस्थित करून सिद्धरामय्या यांनी आपल्यावरील टीकेला उत्तर दिले आहे. धर्मस्थळ मंजुनाथ एक जागृत शिवतीर्थ आहे. शिवदर्शन घेताना मांसाहार करू नये, असा दंडक शिवभक्तांनीच घालून घेतला आहे. मन शुद्ध असेल तर सर्व काही शुद्धच असते. देव हा भाव भक्तीचा भुकेला आहे हे खरे असले तरी प्रत्येक धार्मिक ठिकाणी देवदर्शन घेण्यासाठी जाताना मनाबरोबरच शरीरही पवित्र असावे याची काळजी घेतली जाते. यातूनच अभक्ष्य भक्षण करून शिवदर्शन करणे मुख्यमंत्र्यांना डोकेदुखीचे कारण ठरू लागले आहे. याचा फायदा वेगळय़ा अर्थाने उचलण्याचा प्रयत्न भाजपने आतापासूनच सुरू केला आहे.

नरेंद्र मोदी हे शिवभक्त आहेत. काशी, विश्वनाथ, केदारनाथ किंवा जन्मगावी शिवदर्शन घेताना ते नेहमीच पावित्र्य पाळत आले आहेत. याच पावित्र्याने 29 ऑक्टोबर रोजी ते धर्मस्थळ मंजुनाथाचे दर्शन घेणार आहेत अशी जाहिरातबाजी सुरू झाली आहे. आहार शाकाहारी असो किंवा मासांहारी, गरिबाला तो मिळणे आणि भूक भागविणे याचीच भ्रांत असते. खाऊन खाऊन पोटे सुटलेल्या राजकारण्यांना मात्र त्याची जोड देत धार्मिकतेचे राजकारण करण्याची एक संधीच कर्नाटकात मिळाली आहे.

Related posts: