|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वाहतुकीला शिस्त लावणे आवश्यक

वाहतुकीला शिस्त लावणे आवश्यक 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

देशात दरवर्षी दीड लाख लोक रस्ता अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याने हे अपघात होत आहेत. त्यामुळे शालेय स्तरावरच मुलांना वाहतुकीचे नियम माहीत व्हावेत. तसेच वाहतुकीला  शिस्त लागणे आवश्यक आहे असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय आवारात परिवहन अधिकारी डी.टी. पवार लिखित  ’प्रकाश वाटेकडे सुरक्षित प्रवास’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात खासदार महाडिक बोलत  होते.

अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीचे नियम, कायदे याची माहिती मिळावी, तसेच 5 वी ते 10 वीपर्यंतच्या मुलांना शालेय अभ्यासक्रमात वाहतुकीचे नियम समजावेत यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी ’प्रकाश वाटेकडे सुरक्षित प्रवास’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन व ते जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सभापती अंबरिश घाटगे यांच्याकडे हस्तांतरण समारंभ बुधवारी पार पडला. यावेळी महापौर हसीना फरास, न्याय व विधी विभागाचे सचिव न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, लॉरी असोसिएशनचे सुभाष जाधव आदी मान्यवर हजर होते. जिल्हा ऑटोरिक्षा व्यावसायिक संघटना व डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी महापौर हसीना फरास म्हणाल्या, सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघात टाळण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम तर पाळले पाहिजेत, शिवाय हेल्मेट वापरावे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळावे. महापालिकेच्या शाळांत डॉ. पवार यांनी लिहिलेले पुस्तक पुरवण्याची जबाबदारी मी घेत आहे. न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे म्हणाले, गेल्या वर्षभरात अपघातग्रस्त कुटुंबीयांना आम्ही 13 कोटी रुपयांचा अपघात विमा मिळवून दिला आहे. अपघातात एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या कुटुंबावर होणारा आघात मोठा असतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्याची गरज आहे.

अंबरिश घाटगे व पुस्तकाचे लेखक डॉ. डी. टी. पवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन विभागाचे सर्व अधिकारी, निरीक्षक, रिक्षा संघटनेचे राजू जाधव यांच्यासह सर्व रिक्षाचालक, कर्मचारी मोठय़ा संख्येने हजर होते.

Related posts: