|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » वांद्रय़ात झोपडपट्टीला भीषण आग

वांद्रय़ात झोपडपट्टीला भीषण आग 

रेल्वे स्थानक परिसरात अधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई

कारवाईदरम्यान गॅस सिलिंडर स्फोट, आगीत अनेक झोपडय़ा जळून खाक

अग्निशमन दलाच्या जवानासह नागरिक जखमी

मुंबई / प्रतिनिधी

वांद्रे पूर्व गरीब नगर, बेहराम पाडा येथे गुरुवारी दुपारी पालिका वार्डमार्फत अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत अनेक झोपडय़ा जाळून खाक झाल्या. या आगीत अग्निशमन दलाचे जवान अरविंद घाडे (43), स्थानिक नागरिक रिजवान सय्यद (41) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालिकेच्या एच/पूर्व वार्डमार्फत आज दुपारी काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने झोपडय़ांना आग लागली. त्यामुळे झोपडीधारक आणि पालिकेच्या तोडकारवाई करणाऱया पथकाची एकच धावपळ झाली. सदर झोपडपट्टीत बेकायदेशीरपणे तीन-चार मजली घरे बांधण्यात आली असून हा परिसर दाटीवाटीचा आहे. या झोपडय़ांमध्ये जरीकाम, लघु उद्योग, कपडय़ांचा व्यवसाय व अन्य रोजगाराची कामे केली जातात. ही आग लागताच प्रथम स्थानिक नागरिकांनी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्याबाहेर गेल्याने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाला तेथील आगीचा काळा कुट्ट धूर, अग्नी ज्वाला आणि दाटीवाटीची लोक वस्ती, स्कायवॉक, रेल्वे पूल यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात मोठी अडचण निर्माण झाली. या आगीत अनेकांचे संसार जळून खाक झाले आहेत.

आगीमुळे हार्बर मार्गावरील वडाळा-वांद्रे-अंधेरी मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. वांद्रे तिकीट खिडकीला देखील आगीची झळ बसली. तसेच दक्षिणेकडील पादचारी पुलावरील तिकीट खिडकीजवळील फर्निचर आणि अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी 16 फायर इंजिन, 10 पाण्याचे टँकर यांच्या सहाय्याने आगीवर सायंकाळी उशिराने नियंत्रण मिळवले. मात्र, आग कशी लागली याबाबत चौकशी सुरू आहे.

 

48 तासात घरे तोडण्याची पालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. मात्र, गुरुवारी सकाळी 11 वाजता पालिकेच्या कर्मचाऱयांनी झोपडय़ा पाडायला सुरुवात केली. परंतु, आम्हाला घरातील सामान बाहेर नेण्यास अधिकाऱयांनी वेळच न दिल्याने घरातील गॅस, सिलेंडर आम्ही तिथेच सोडून आलो. त्यामुळेच ही आग पसरली आहे.

मेहबुबी शरीफ खान, नागरिक

आग लागली तेव्हा मी घरी झोपलो होतो. अचानक घरात आगीच्या ज्वाळा आणि धूर येऊ लागला. काही दिसेनासे झाले. परंतु, त्यातून मार्ग काढत मी माझ्या मुलांना, सासूला घराबाहेर काढले. तेव्हाच सिलिंडरचा स्फोट झाला. आवाजाने मी पूर्णतः घाबरून गेलो होतो. घरात 5 ते 10 हजार रुपये होते त्याचे काय झाले असेल त्याचा मी विचार करत आहे.

– मोहम्मद झुबेर,(28), नागरिक

Related posts: