|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘दुरांतो एक्प्रेस’ बालबाल बचावली

‘दुरांतो एक्प्रेस’ बालबाल बचावली 

प्रतिनिधी /सावंतवाडी :

सावंतवाडी रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर नेमळे पाटकरवाडी येथे एर्नाकुलमवरून मुंबईला जाणाऱया दुरांतो एक्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. मोटरमन बी. सी. सुधाकर आणि ट्रकमन दिनेश म्हाडेश्वर यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अपघात टळून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कोकण रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अपघातापूर्वी सुरू असलेले नवीन रुळ घालण्याचे काम कामगारांनी गडगडाटासह आलेल्या पावसाच्या भीतीने अर्धवट टाकत तेथून पळ काढला. त्यामुळे नव्या रुळाचे शेवटचे टोक सध्याच्या रेल्वे रुळावर आले. तसेच नव्या रुळाखाली घालण्यात आलेली ‘पारय’ सध्याच्या रेल्वे रुळावर आल्याचे घटनास्थळी दिसून आले.

दुरांतो एक्प्रेस एर्नाकुलमवरून मुंबईला जात होती. ही गाडी दुपारी सावंतवाडीत आली. सावंतवाडी रेल्वेस्थानकावरून काही अंतर पुढे गेली असता रेल्वेचे मोटरमन बी. सी. सुधाकर यांना रेल्वे रुळाजवळ एक तुकडा वर आलेला दिसला त्यामुळे त्यांनी तात्काळ ब्रेक लावला. ब्रेक लावल्यामुळे रेल्वेचे इंजिन रुळावरून खाली उतरले. काही अंतर फरफटत जाऊन ते थांबले. अचानक ब्रेक दाबल्यामुळे प्रवाशांमध्ये हाहाकार उडाला. काही प्रवासी डब्यातच पडले. दुपारी याच दरम्यान पाऊस सुरू झाला होता. रेल्वे इंजिन रुळावरून घसरल्याची माहिती कळताच कोकण रेल्वे प्रशासनाने पावले उचलत सावंतवाडी रेल्वेस्थानकात येऊन थांबलेल्या तुतारी एक्प्रेसचे इंजिन घेऊन दुरांतो एक्सप्रेसच्या प्रवाशांना सावंतवाडी रेल्वे स्थानकात आणले. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. रेल्वे प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने घसरलेले इंजिन तात्काळ काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कोकण रेल्वेचे क्षेत्रीय अभियंता बाबासाहेब मडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे अधिकारी व कर्मचारी दुरांतो एक्प्रेसचे इंजिन काढण्याचे काम करत होते. अपघाताचे ठिकाण काहीसे दुर्गम भागात असल्याने प्रशासनाला अडचणी येत होत्या. परंतु अशाही परिस्थितीत दुसऱया रेल्वे इंजिनने मशिनरी आणून रेल्वे इंजिन काढण्याचे काम हाती घेतले. सुमारे दीड तासाने हे काम सुरू करण्यात आले.