|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शेळपे, नानेली, शिंगणे गावांसाठी 2 कोटीची पाणी पुरवठा योजना

शेळपे, नानेली, शिंगणे गावांसाठी 2 कोटीची पाणी पुरवठा योजना 

उदय सावंत /वाळपई :

अतिसारासारख्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रकाशात आलेल्या शेळपे व शेजारील शिंगणे व नानेली गावासाठी 2 कोटी रुपये खर्च करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी योजना राबविण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावरील कामाला सुरूवातही झाली आहे. दोन दिवसापूर्वी बांधकाममंत्री, स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व संबंधित अधिकारी यांची पणजी येथे झालेल्या बैठकीत येथील समस्यांवर चर्चा करण्यात आली. शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार असली तरी शौचालयांबाबत ठोस निर्णय या बैठकीत झाला नसल्यामुळे सध्यातरी गावातील लोकांना शौचासाठी उघडय़ावरच जाणे भाग आहे.

या योजनेच्या माध्यमातून दाबोस शुद्धीकरण पाणी प्रकल्पातून खास जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. सरकारने या कामासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या गावात असलेली पाण्याची समस्या अतिसाराच्या आजारामुळे उजेडात आली आहे. वृत्तपत्रातून पूरक बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारपातळीवरून याची दखल घेण्यात आली. बैठकीत याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना वाळपई पाणी पुरवढा कार्यालयाला देण्यात आली असून 15 नोव्हेंबरपूर्वी या प्रस्तावाला मान्यता देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

बोअरवेल, नाल्यातील पाण्याच्या वापरावर बंदी

सध्या गावात वापरण्यात येत असलेल्या बोअरवेलच्या पाण्याचा वापर करू नये, अशी सूचनाही करण्यात आली. या बोअरवेलचे पाणी गढूळ असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून आल्या आहेत. काही ग्रामस्थ नाल्याच्या पाण्याचा वापर करत आहेत. त्यांनी नाल्याच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये, अशीही सूचना या बैठकीत पाणी पुरवठा खात्याला करण्यात आली आहे. या नाल्याच्या पाण्यात शिगेला नामक बॅक्टेरिया असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे पाणी आरोग्यास हे पाणी हानीकारण आहे.