|Saturday, October 20, 2018
You are here: Home » उद्योग » पीएसयू बँक समभागांमध्ये नफा कमाईने घसरण

पीएसयू बँक समभागांमध्ये नफा कमाईने घसरण 

बीएसईचा सेन्सेक्स वधारला, एनएसईचा निफ्टी घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

भांडवली बाजार प्रत्येक सत्रात विक्रमी पातळीवर पोहोचत आहे. सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांक प्रस्थापित केला होता. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 10,366 आणि सेन्सेक्स 33,286 या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. मात्र ही तेजी कायम ठेवण्यात भांडवली बाजारास अपयश आले. दिवसअखेरीस सेन्सेक्स किरकोळ तेजी आणि निफ्टी घसरत बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात काही प्रमाणात खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक घसरला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.25 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला.

बँकिंग, रिअल्टी, आयटी, धातू, तेल आणि वायू समभागात विक्री झाल्याने दबाव कायम होता. बँक निफ्टी 0.75 टक्क्यांनी घसरत 24,839 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 4.2 टक्के, आयटी निर्देशांक 0.2 टक्के, धातू निर्देशांक 0.2 टक्क्यांनी कमजोर झाले. बीएसईचा रिअल्टी निर्देशांक 0.5 टक्के आणि तेल आणि वायू निर्देशांक 1.2 टक्क्यांनी घसरले.

वाहन, एफएमसीजी, मीडिया, औषध समभागात चांगली खरेदी झाली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 1 टक्का, एफएमसीजी निर्देशांक 0.7 टक्के, मीडिया निर्देशांक 1.5 टक्के, औषध निर्देशांक 2.4 टक्क्यांनी मजबूत झाला.

बीएसईचा सेन्सक्स 10 अंशाने वधारत 33,157 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 21 अंशाने घसरत 10,323 वर स्थिरावला.

दिग्गज समभागांची कामगिरी

अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, ओएनजीसी, सन फार्मा, टाटा पॉवर, टाटा मोटर्स डीव्हीआर, टाटा मोटर्स 4.3-2.5 टक्क्यांनी वधारले. भारती इन्फ्राटेल, येस बँक, एचपीसीएल, भारती एअरटेल, आयओसी, एसबीआय, विप्रो, रिलायन्स इन्डस्ट्रीज आणि एनटीपीसी 8.1-1.5 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात वॉटहार्ट, युनायटेड ब्रुअरिज, टाटा ग्लोबल ब्रुअरीज, सेल आणि ईमामी 5.75-4.2 टक्क्यांनी मजबूत झाले. आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, सेन्ट्रल बँक 8-4.8 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात हिटलबर्ग सिमेंट, ग्लोबल स्पिरिट्स, आशापूरा माईन्स, आयनॉक्स विंड आणि बटरफ्लाय 20-12.9 टक्क्यांनी वधारले.

Related posts: