|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कॉ. संपत देसाई यांना धमकीचे पत्र

कॉ. संपत देसाई यांना धमकीचे पत्र 

प्रतिनिधी/ आजरा

लोकशाही श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांना धमकीचे पत्र अज्ञाताकडून पाठविण्यात आले आहे. पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी श्रमिकच्या कार्यालयात झालेल्या परीवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत धमकीचा निषेध करण्यात आला. तर याबाबतची तक्रारही आजरा पोलीसात करण्यात आली.

यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे म्हणाले, विचारांची लढाई विचाराने लढायची असते. अशा भ्याड धमक्यांना आम्ही घाबरणारे नसून यापुढेही आमची विचारांची लढाई सुरू राहणार आहे. कॉ. देसाई यांनी आजवर कष्टकऱयांचे प्रश्न मांडून लोकशाही मार्गाने आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पुरोगामी विचार मांडणाऱया कार्यकर्त्यांना अशा प्रकारे धमकी देऊन विचार संपविण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असून अशा प्रकारांनी विचार संपत नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कॉ. संजय तर्डेकर, प्रा. सुनील गुरव, संग्राम सावंत, सतीश कांबळे यांनी आपले मत मांडले. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या करणाऱया विचारधारेनेच हे धमकीचे पत्र पाठविले असल्याचा आरोपही करण्यात आला. या धमकीच्या पत्राचा निषेध करून दि. 5 नोव्हेंबर रोजी बाजार मैदानात निर्धार व निषेध मेळावा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हा मेळावा डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव, प्रमोद मुजुमदार, हुमायून मुरसल यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले.

या बैठकीला डॉ. नवनाथ शिंदे, हरी सावंत, नारायण भडांगे, प्रकाश मोरूस्कर, शंकर पावले, रवी कांबळे, संदीप कांबळे यांच्यासह धरणग्रस्त संघटना, श्रमिक मुक्ती दल, लोकशाहीवादी श्रमिक मुक्ती दल, सेक्युलर मुव्हमेंट आदि परीवर्तनवादी चळवळींचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: