|Friday, April 19, 2019
You are here: Home » क्रिडा » किदाम्बी श्रीकांतची अंतिम फेरीत धडक

किदाम्बी श्रीकांतची अंतिम फेरीत धडक 

प्रेंच ओपन बॅडमिंटन : मायदेशी सहकारी प्रणॉयवर मात, सिंधूलाही पराभवाचा धक्का

वृत्तसंस्था/ पॅरिस

प्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांतने आपला धडाका कायम ठेवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी श्रीकांतने मायदेशी सहकारी प्रणॉयला पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे, श्रीकांत यंदाच्या हंगामात पाचवेळा सुपरसीरिज स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. जेतेपदासाठी त्याची लढत जपानच्या निशिमोटोशी होईल. महिला एकेरीत ऑलिम्पिक रौप्यजेत्या सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. 

पुरुष एकेरीतील शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात श्रीकांतने एचएस प्रणॉयला 14-21, 21-19, 21-18 असे 62 मिनिटांच्या खेळात नमवत अंतिम फेरीत धडक मारली. या शानदार विजयासह श्रीकांतने या हंगामात चीनच्या लिन डॅनला मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावे केला. एका वर्षात 36 सामने जिंकत श्रीकांतने डॅनचा 34 सामने जिंकण्याचा विक्रम मोडित काढला. याशिवाय, सुपरसीरिज स्पर्धेची पाचवेळा अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मानही त्याने पटकावला. प्रणॉयने पहिला गेम जिंकत धडाक्यात प्रारंभ केला होता पण सातत्य राखण्यात अपयश आल्याने त्याला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी होणाऱया अंतिम लढतीत श्रीकांतसमोर जपानच्या केन्टा निशिमोटोचे आव्हान असेल. निशिमोटोने दुसऱया उपांत्य लढतीत डेन्मार्कच्या अँडर्स अँटनसेनवर 21-17, 21-15 अशी मात करून अंतिम फेरी गाठली.

यंदाच्या हंगामात श्रीकांतने इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया व डेन्मार्क या सुपरसीरिजचे जेतेपद पटकावले आहे. याशिवाय, सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीतही श्रीकांतने धडक मारली होती. यामुळे आज होणाऱया अंतिम लढतीत जेतेपद मिळवल्यास त्याचे वर्षातील चौथे सुपरसीरिज जेतेपद ठरेल.

सिंधूचा पराभव

महिला एकेरीतील उपांत्य लढतीत सिंधूचे आव्हान जपानच्या अकाने यामागुचीने केवळ 37 मिनिटांत संपुष्टात आणले. शनिवारी झालेल्या या एकतर्फी लढतीत यामागुचीने सिंधूला 21-14, 21-9 असे एकतर्फी नमविले. जेतेपदासाठी यामागुचीसमोर चिनी तैपेईच्या अग्रमानांकित तेई झु यिंगचे आव्हान असेल. पहिल्या गेममध्ये 14-14 पर्यंत सिंधूने तोडीस तोड खेळ केला. पण त्यानंतर अचानक तिचा जोम ओसरला आणि यामागुचीने सलग 7 गुण घेत पहिला गेम संपविला. दुसऱया गेममध्येही सिंधूला नेटजवळ येण्याची संधी न देता सहज जिंकून यामागुचीने अंतिम फेरी गाठली.

Related posts: