|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मद्यपी शिक्षकाचा शाळेत धिंगाणा

मद्यपी शिक्षकाचा शाळेत धिंगाणा 

वार्ताहर/ अथणी

विष्णूवाडी (ता. अथणी) येथील सुनदखोडी मळा शाळेतील शिक्षकाने शाळेत मद्यपान करुन धिंगाणा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एन. ए. मोमीन असे सदर शिक्षकाचे नाव आहे. सदर प्रकार घडताच मोमीन यांना  एसडीएमसी समितीच्या पदाधिकाऱयांनी तत्काळ त्यांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर केले. या प्रकाराने परिसरात सदर शिक्षकाच्या कृत्याबाबत संताप व नाराजी व्यक्त होत आहे.

 

येथे पाचवीपर्यंत मराठी शाळा आहे. मोमीन हा रोज शाळेत मद्यप्राशन करुनच विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करतो. याआधीही मोमीन याने मद्यप्राशन करुन शाळेत धिंगाणा घातला. त्यावेळी त्याला अन्य शिक्षकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याने त्याचा विचार न केल्याने सदर प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी दारुच्या बाटलीसह मोमीन याला गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

निलंबनाची कारवाई करणार

 

सदर प्रकारबाबत गटशिक्षणाधिकारी एम. वाय. व्हनकस्तुरी यांच्याशी संपर्क साधला असता, मोमीन याच्यावर कडक कारवाई करण्याबाबत डीडीपीआय चिकोडी यांच्याकडे अहवाल पाठविला आहे. लवकरच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.