|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसचे काळ्यापैशाला समर्थन ; प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल

काँग्रेसचे काळ्यापैशाला समर्थन ; प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल 

ऑनलाईन टीम / पुणे :

भारतीय जनता पक्ष येत्या 8 नोव्हेंबरला ‘काळापैसाविरोधी दिन’ साजरा करत असताना त्याच दिवशी काँग्रेस ‘काळापैसा बचाव’ याकरिता आंदोलन छेडणार आहे. यावरुन काँग्रेसचे काळ्यापैशाला समर्थन असल्याचे दिसत आहे, असा हल्लाबोल केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केला.

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, राजीव गांधींच्या काळात काळापैसाविरोधी कायदा लागू केला गेला नाही. मात्र, आमच्या सरकारने यासाठी कायदा तयार केला आणि तो लागूही केला गेला. नोटाबंदीच्या काळात 2 लाखांहून अधिक बनावट कंपन्या असल्याचा पत्ता लागला. या सर्व कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच राजीव गांधी सरकारच्या कार्यकाळात गरिबांना 100 रुपये दिले तर त्यांना 50 रुपयेच मिळायचे बाकी पैसे दलाल आणि अन्य लोक खात असत. मात्र, आता 100 रुपये दिले तर 100 रुपयेच गरिबांना मिळत आहेत. सरकारच्या कार्यतत्परतेमुळे 300 योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे सरकारचे तब्बल 54 हजार कोटी रुपये वाचल्याचेही जावडेकर म्हणाले.