|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गातील युवा कलाकारांवर अन्याय

सिंधुदुर्गातील युवा कलाकारांवर अन्याय 

माध्यमिक शिक्षण विभागाचा अजब कारभार

कला उत्सवाची माहिती तब्बल महिन्यानंतर पाठविली

कलाध्यापक संघाकडून नाराजी व्यक्त

प्रतिनिधी / मालवण:

शासनातर्फे घेण्यात येणाऱया कला उत्सवाच्या माहितीचे पत्रक राज्य शासनाकडून 19 सप्टेंबरला जिल्हय़ाच्या माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हे पत्र तब्बल महिन्यानंतर 25 ऑक्टोबरला जिल्हय़ातील माध्यमिक शाळांना पाठविण्यात आले. जिल्हय़ात अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम बसविण्यासाठी शिक्षक वर्ग आणि संस्था चालक प्रयत्नशील असताना माध्यमिक शिक्षण विभागाकडून चुकीच्या पद्धतीने नियोजन केले गेल्याबद्दल कलाध्यापक संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्गातील  विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाकडून अन्यायच केला गेल्याचा आरोप केला आहे.

केंद्र सरकारकडून 2015 पासून दरवर्षी माध्यमिकस्तरावर कला उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक कला, आदिवासी, लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाटय़ असे परंपरा जपणारे विषय आणि संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी म्हणून हा कला उत्सव राष्ट्रीयस्तरापर्यंत साजरा होतो. या साठीच्या पारितोषिकांची रक्कम अनुक्रमे विभागाला प्रथम 1 लाख 25 हजार, द्वितीय 75 हजार, तृतीय 50 हजार रुपये शिवाय विभागस्तरापासून पुढे सर्व प्रवासखर्च केंद्रामार्फत केला जातो. कला उत्सवात शासनाकडून प्रत्येकवर्षी एक विषय सादरीकरणासाठी ठरवून दिला जातो. त्यानुसार कला प्रकार आपण सादर करणार त्याचा इतिहास, तो कलाप्रकार सादर करणाऱया कलाकारांच्या मुलाखती, लेखी दस्तऐवज इत्यादी पहिल्यांदा तयार करावे लागतात. त्या कलेविषयी माहितीपट तयार करावा लागतो. यातून उद्ययोन्मुख कलाकारांना त्या कलेविषयी आवड निर्माण होऊन कलाकार तयार होतील, असा शासनाचा उद्देश आहे. मात्र, शासनाचा मुख्य उद्देशच बाजूला ठेवण्याचे काम शिक्षण विभागाने केले आहे. राज्य शासनातर्फे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्यावतीने 19 सप्टेंबरला पत्र पाठविण्यात आले होते.

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड

 या वर्षी कला उत्सव साजरा करण्यासाठीच पत्र शिक्षण विभाग माध्यमिक, सिंधुदुर्ग यांच्या बोगस कारभारामुळे तब्ब्ल महिन्यापेक्षा जास्त उशिरा सर्व शाळांना 25 ऑक्टोबर रोजी मिळाले. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून हे पत्र सिंधुदुर्ग माध्यमिक विभागाला 19 सप्टेंबर रोजी मिळाले. परंतु त्यावर कोणताही विचार शिक्षण विभागाकडून झाला नाही. शिवाय जिल्हास्तरीय कला उत्सव 10 ऑक्टोबरला प्रत्येक जिल्हय़ात घ्यायचा होता. त्याची तारीख बदलून जिल्हा शिक्षण विभागाने 7 नोव्हेंबर व तालुका कला उत्सवाची तारीख 31 ऑक्टोबर या दिवसांना ठरवत कला उत्सवाची आणि केंद्र सरकारच्या उपक्रमाची चेष्टा केली आहे. अवघ्या चार दिवसांत तीस मिनिटांचे लोकनाटय़ बसविले आणि स्पर्धेत सादर करणे शक्य आहे का? मुलांकडून लोकनृत्याचा अभ्यास करणे चार दिवसांमध्ये शक्य आहे का? कोणताही कला प्रकार इतक्या कमी वेळेत विषयाला अनुसरून सादरीकरण करणे, केवळ अशक्य आहे, असेही मत व्यक्त केले जात आहे.

कलाध्यापक संघाकडून तीव्र नाराजी

 सलग दोन वर्षे सिंधुदुर्ग शिक्षण विभागाला सूचना करूनही या वर्षी पुन्हा तीच चूक केली आहे. सिंधुदुर्गात असंख्य कलाकार आहेत आणि कला जोपासण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. विद्यार्थी घडवीत आहेत. अशावेळी शासनामार्फत राबविल्या जाणाऱया अशा कला उत्सवांमध्ये केवळ अपुऱया सरावामुळे जर आमचे विद्यार्थी मागे पडत असतील, तर ही गोष्ट निंदनीय आहे. आम्ही कलाध्यापक संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने या प्रकाराचा निषेध करीत आहोत. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग कलाध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश नेवगी यांनी केली आहे.

Related posts: