|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘लिंबू-मिरची बांधा, प्रवास सुखाचा व्हावा!’

‘लिंबू-मिरची बांधा, प्रवास सुखाचा व्हावा!’ 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे झारापला अभिनव आंदोलन

महामार्गाच्या चाळणीकडे वेधले लक्ष

पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध व संताप

वार्ताहर / कुडाळ:

 मुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांमुळे उद्भवलेल्या दयनीय परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने रविवारी झाराप तिठा येथे आगळय़ावेगळय़ा पद्धतीने ‘लिंबू-मिरची बांधो’ आंदोलन करण्यात आले. आता सरकारच्या नाही, तर देवाच्या भरवशावर प्रवास करा, असा संदेश वाहन चालकांना देण्यात आला. पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करून पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

 महामार्गावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरश: चाळण बनली आहे. वाहनधारकांना व प्रवाशांना खडतर प्रवास करावा लागत आहे. या भयावह परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कुडाळ तालुका व साळगाव विभागाच्यावतीने आज ‘लिंबू-मिरची बांधो’ आंदोलन करून रोष व्यक्त करण्यात आला.

 झाराप तिठा येथील महामार्गावर पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते एकवटले. महामार्गावरून जाणाऱया वाहनांना थांबवून त्यांना लिंबू-मिरची बांधून प्रवास सुखाचा व्हावा, असा संदेश दिला. खड्डय़ांमुळे दुर्घटना होऊ नये. प्रवास सुखाचा व्हावा. सत्ताधारी कुचकामी ठरले असून आता देवावर भरवसा ठेवून प्रवास करायची वेळ आली आहे, असे सांगून काही वाहनधारकांना लिंबू-मिरची वाटप करण्यात आले. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप करीत घोषणाबाजी करण्यात आली.

 जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, जि. प. माजी अध्यक्ष दिनेश साळगावकर, माजी सभापती ऍड. विवेक मांडकुलकर व मोहन सावंत, झाराप पं. स. सदस्या स्वप्ना वारंग, कुडाळ नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष आबा धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर, साळगाव विभागीय अध्यक्ष रुपेश कानडे, साळगाव सरपंच समीर हळदणकर, उपसरपंच उमेश धुरी, हुमरस सरपंच सोनू मेस्त्राr, तेर्सेबांबर्डे नूतन सरपंच संतोष डिचोलकर, उपसरपंच अजय डिचोलकर, अमित दळवी, रुपेश बिडये, नीलेश तेली, बाबू सावंत, उत्तम डिचोलकर, हरि डिचोलकर, बंडय़ा पारकर तसेच कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

                आता ‘लिंबू-मिरची बांधा’ योजना

 पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ‘चांदा ते बांदा’ योजनेंतर्गत निधी आणला, अशी फक्त घोषणा केली. प्रत्यक्षात कृतीत काहीच नाही. सेनेचे मंत्री सत्तेत आहेत. पण त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजे होते. फक्त घोषणा करणाऱया येथील पालकमंत्र्यांचा आम्ही निषेध करतो, असे देसाई यांनी सांगून आमदार वैभव नाईक यांनी जनतेचा अपेक्षाभंग केल्याचा आरोपही केला. ‘चांदा ते बांदा’ योजना नाही, तर आता ‘प्रवास करताना वाहनांना लिंबू-मिरची बांधा’ योजना’, असे म्हणावे लागेल, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

                    ..अन्यथा रास्तारोको आंदोलन

 महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास चार-पाच वर्षे कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा महामार्ग सुरक्षित नसल्यास जनतेला त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करून तो सुस्थितीत ठेवावा. अन्यथा येत्या आठ-दहा दिवसांत आम्हाला झाराप व कणकवली येथे रास्तारोको आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देसाई यांनी दिला.

              आंदोलन जाहीर करताच कामाला सुरुवात

 सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे हा रस्ता असुरक्षित बनला. लोकप्रतिनिधींना जनतेच्या सुरक्षिततेचे गांभीर्य नाही. त्यासाठी आम्ही हे आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे शनिवारपासून झाराप येथून खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात आले, असा आरोप रुपेश कानडे यांनी करीत पण आम्ही आंदोलनाच्या पवित्र्याशी ठाम राहिल्याचे स्पष्ट केले.

Related posts: