|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » मिलरचे टी-20 मधील वेगवान शतक

मिलरचे टी-20 मधील वेगवान शतक 

दुसऱया टी-20 सामन्यात द.आफ्रिकेची बांगलादेशवर 83 धावांनी मात

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

डेव्हिड मिलर (36 चेंडूत 7 चौकार व 9 षटकारासह नाबाद 101) व हाशिम आमला (51 चेंडूत 85) यांची तुफानी खेळी व नंतर गोलंदाजानी बजावलेल्या चोख कामगिरीच्या जोरावर द.आफ्रिकेने दुसऱया टी-20 सामन्यात बांगलादेशवर 83 धावांनी विजय मिळवला. या शानदार विजयासह यजमान संघाने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. प्रारंभी, द.आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 18.3 षटकांत 141 धावांवर आटोपला. विशेष म्हणजे, सामनावीर ठरलेल्या डावखुऱया डेव्हिड मिलरने टी-20 वेगवान शतक झळकावताना अवघ्या 36 चेंडूत नाबाद 101 धावा कुटल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱया द.आफ्रिकन फलंदाजानी बांगलादेशी गोलंदाजाची अक्षरश: कत्तल केली. प्रारंभी, सलामीवीर एम.मोश्ले (5) व कर्णधार जेपी डय़ुमिनी (4) हे स्वस्तात बाद झाले. यानंतर, डीव्हिलीयर्सही (15 चेंडूत 20) फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. मात्र, अनुभवी हाशिम आमला व डेव्हिड मिलर जोडीने संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 79 धावांची भागीदारी साकारली. आमलाने 51 चेंडूत 11 चौकार व 1 षटकारासह 85 धावांचे योगदान दिले. शतकाच्या उंबरठय़ावर असलेल्या आमलाला 85 धावांवर सैफुद्दीनने बाद करत ही जोडी बाद फोडली.

आमला बाद झाल्यानंतर मात्र मिलरने मात्र तुफानी खेळी साकारताना शेवटच्या तीन षटकांत 67 धावांची बरसात करत संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. मिलरने टी-20 मधील वेगवान शतक साजरे करताना अवघ्या 35 चेंडूतच शतक साजरे केले. त्याच्या शतकी खेळीत 7 चौकार व 9 षटकारांचा समावेश राहिला. आमला व मिलरच्या या तुफानी खेळीमुळे द.आफ्रिकेला 20 षटकांत 4 बाद 224 धावा केल्या. बेहर्दीन 6 धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशतर्फे शकीब व सैफुद्दीनने दोन गडी बाद केले.

द.आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेल्या 225 धावांच्या मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 18.3 षटकांत 141 धावांवर संपुष्टात आला. डय़ुमिनी (2/22) व फँगिसो (2/31) यांच्या भेदक माऱयासमोर बांगलादेशच्या एकाही फलंदाजाचा टिकाव लागला नाही. बांगलादेशतर्फे सौम्या सरकारने सर्वाधिक 41 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. मेहमुदुदल्लाहने 24 तर सैफुद्दीनने 23 धावा फटकावल्या. द.आफ्रिकेतर्फे डय़ुमिनी व फँगिसो यांनी प्रत्येकी 2 तर हेंडरिक्स, फ्लायलिंक व प्रिटोरियस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 4 बाद 224 (आमला 85, मिलर 36 चेंडूत नाबाद 101, बेहर्दीन नाबाद 6, शकीब 2/22, सैफुद्दीन 2/53).

बांगलादेश 18.3 षटकांत सर्वबाद 141 (सौम्या सरकार 44, मेहमुदुल्लाह 24, सैफुद्दीन 23, डय़ुमिनी 2/22, फँगिसो 2/31).