|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कार्तिकीसाठी दोन लाख भाविक दाखल

कार्तिकीसाठी दोन लाख भाविक दाखल 

पंढरपूर / प्रतिनिधी

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात दोन लाखाहून अधिक भाविकांची गर्दी झाली आहे. अनेक पायी दिंडय़ा पंढरीत दाखल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण विठ्ठल नगरी  हरिनामाच्या गजरात आजपासून दुमदुमू लागली आहे. यामध्येच मंगळवारी होणाऱया एकादशीच्या महापूजेसाठी महसुलमंत्री पंढरपुरात येणार आहेत.

कार्तिकी एकादशीचा अनुपम्य सोहळा अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे. अशामध्येच सर्व पंढरपूर भाविकांनी हाउसफ्gढल्ल होण्यास सुरूवात झालेली आहे. त्यामुळे पंढरीत हरिनामाच्या गजरासह, चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर तसेच 65 एकर गजबजले आहे.

यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. तसेच नदी, ओढे, नाले, धरणे, विहीरी तुडूंब भरल्या आहेत. शेतीमध्ये चांगले पीक येणार आहे. त्यामुळे आनंदी असलेला शेतकरी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहे.

कार्तिकी यात्रा मुख्यत्वे करून मुंबई आणि कोकण येथील भाविकांची यात्रा म्हणून ओळखली जात असते. यात्रेस कोकणी टच असतो. यात मंगळवारच्या एकादशीच्या पूर्वीच आलेला शनिवार आणि रविवार त्यामुळे अनेक भाविकांनी पंढरपूरची यात्रा सलग चार दिवस करण्याचे योजिले दिसून येत आहे. तब्बल 2 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.

कार्तिकी यात्रेसाठी सध्या कोकण तसेच कोल्हापूर, सातारा या भागामधून अनेक पायी दिंडय़ा दाखल होत आहे. या विविध मठामधून तसे 65 एकर याठिकाणी जाऊन विसावताना दिसून येत आहेत.

भाविकांच्या गर्दीमुळे विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग तब्बल तीन कि.मी. दूरपर्यत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी नऊ तासाचा कालावधी लागत आहे. सध्या हीच गर्दी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर्शनासाठी सोमवारी साधारणपणे पंधरा तास लागू शकतील. तसेच आज मुखदर्शनासाठी तर साधारणपणे चार तास लागत आहेत.

कार्तिकीमध्ये विठ्ठल दर्शनासोबतच जनावरांचा बाजार हे एक प्रमुख आकर्षण असते. यंदाच्या वारीसाठी वाखरीच्या पालखीतळावर मोठया प्रमाणावर जनावरे दाखल झाली आहेत.

यात्रेंसाठी सध्या संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी पहाटे अडीच वाजता राज्यांचे महसुलमंत्री चंद्रकात पाटील यांच्याहस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे. यावेळी मानाचे वारकरी उपस्थित असणार आहेत. यानंतर विठ्ठल मंदिरातच टोकन दर्शन सेवेचा प्रायोगिक तत्वावर महसुलमंत्री यांच्याहस्ते टोकन वितरीत करून शुभारंभ होईल. तसेच यावेळी वॉटर एटीएम सुरू होणार आहेत.

यंदाच्या वारीसाठी मंगळवारच्या एकादशीपर्यंत सुमारे पाच लाख भाविक दाखल होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. यासाठी मंदिर समिती तसेच प्रशासनाने  सर्व सोयीसुविधांनी पंढरी नगरी सज्ज करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी अनेक ठिकाणी त्रुटी आढळून येताना दिसत आहेत.

Related posts: