|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भूमिगत केबल आता गटारांमध्येही

भूमिगत केबल आता गटारांमध्येही 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरात भूमिगत विद्युत वाहिन्या, टेलिफोन केबल आणि जलवाहिन्या घालण्याचे सत्र सुरूच आहे. भूमिगत वाहिन्या घातल्यानंतर उर्वरित केबल गटारीमध्ये टाकण्याचे प्रकार ठिकठिकाणी सुरू आहे. यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होत आहे. कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे.

हेस्कॉम, टेलिफोन खाते, मोबाईल कंपन्या आणि पाणीपुरवठा मंडळाकडून विविध रस्त्याशेजारी भूमिगत वाहिन्या घालण्यासाठी खोदाईसत्र सुरू आहे. यामुळे रस्त्यांची दुरवस्था होतच आहे. मात्र, अलीकडे खोदाईसत्रामुळे ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रकारही सुरू आहेत. काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या विद्युत वाहिन्या, टेलिफोन केबल रस्त्यांवर आणि गटारींमध्ये टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोल्हापूर क्रॉस येथे मोबाईल कंपनीकडून भूमिगत केबल घालण्यात आल्या आहेत. शिल्लक राहिलेली केबल व्यवस्थित ठेवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे न करता सदर केबल गटारीमध्ये टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या नारळ विपेत्यांनीदेखील गटारीमध्ये कचरा टाकला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

ताशिलदार गल्ली व भांदूर गल्लीच्या भंगीबोळांमध्येदेखील हेस्कॉमने विद्युत वाहिन्या गटारीमध्ये टाकल्या आहेत. त्याचप्रमाणे नार्वेकर गल्ली येथे विद्युत वाहिन्यांचा रोल ठेवून गटारीमध्ये वाहिन्या टाकण्यात आल्याने सांडपाणी तुंबून राहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे गटारीमध्ये टाकण्यात आलेल्या केबल हटविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. 

Related posts: