|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » देसूर येथील माऊली मंदिरात धाडसी चोरी

देसूर येथील माऊली मंदिरात धाडसी चोरी 

वार्ताहर / किणये

देसूर गावातील जागृत देवस्थान श्री माऊली मंदिरात चोरी झाली आहे. देवीचा चांदीचा मुखवटा, हार व इतर साहित्य चोरटय़ांनी लांबविले आहेत. सदर चोरीची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. पण हा चोरीचा प्रकार शनिवारी रात्री घडला असल्याची माहिती देसूर ग्रामस्थांनी दिली.

माऊली देवीचा चांदीचा मुखवटा, चांदीचा हार, कमरपट्टा, सोन्याची नथ, मंदिरातील समई आदी साहित्य मिळून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी झाली आहे.

माऊलीच्या मंदिरात चोरी झालीच कशी? याचा विश्वासच अनेक भक्तांना बसत नव्हता. मंदिराच्या पहिल्या दरवाजाचा लोखंडी कुलूप तोडून चोरटय़ांनी मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर देवीच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून गाभाऱयात प्रवेश करून ही चोरी केली आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिराचे पुजारी दुधाप्पा गुरव पूजा करण्यासाठी आले होते. चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यामुळे गावातील पंच कमिटीला त्यांनी लागलीच याबाबत कळविले. बघता बघता मंदिर परिसरात नागरिकांची गर्दी झाली.

पुजाऱयांनी गावकऱयांना माहिती देताच देसूर ग्रामस्थ मंदिराजवळ आले. त्यानंतर वडगाव ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाच्या साहाय्याने चोरटय़ांचा सुगावा लागतो का? याचा प्रयत्न करण्यात आला. पण मंदिरापासून मुख्य रस्त्याजवळ येऊन श्वानपथक घुटमळले.

देसूर गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर माऊलीचे मंदिर आहे. मुख्य रस्त्याजवळ येऊन श्वानपथक घुटमळले. यामुळे रस्त्याच्या आजूबाजूलाच चोरटय़ांनी  आपली वाहने थांबविली असावीत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी दशरथ वसुलकर, रणजित पोटे, शांताराम लक्केबैलकर, अरुण कोळसेकर, पंकज घाडी, मष्णू पाटील, सातेरी नंद्याळकर, अनिल पाटील, रमेश नंद्याळकर, भुजंग गुरव, सुनील पाटील आदींसह पंच मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.  

Related posts: