|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पालिका सफाई कामगारांची निवाऱयासाठी वणवण

पालिका सफाई कामगारांची निवाऱयासाठी वणवण 

निवासस्थाने धोकादायक बनल्याने खोल्या खाली करण्याची नोटीस

वार्ताहर / मालवण:

 मालवण नगर पालिकेच्या कार्यरत असलेल्या सफाई कामगार व कर्मचाऱयांसाठी पालिकेमार्फत शहरातील बांगीवाडा येथे उभारण्यात आलेले दुर्बल घटक निवासस्थान धोकादायक बनले आहे. नगरपालिका प्रशासनाने या इमारतीतील चार सफाई कामगार व दोन कर्मचाऱयांच्या कुटुंबांना तात्काळ खोली खाली करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या सहा कर्मचाऱयांना व त्यांच्या कुटुंबियांना खोल्या शोधण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

  मालवण नगरपरिषदेमार्फत 1985 मध्ये पालिकेतील सफाई कामगारांकरिता शहरातील बांगीवाडा येथे नाटय़गृहाच्या मागील बाजूस दुर्बल घटक निवासस्थान उभारण्यात आले आहे. या इमारतीत एकूण नऊ खोल्या आहेत. यात चार सफाई कामगार व दोन कर्मचारी आपल्या कुटुंबियांसमेवत राहतात. मात्र, अलिकडील काही वर्षांत ही इमारत जीर्ण बनल्याने येथील रहिवाशांनी वारंवार नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. चार वर्षांपूर्वी या इमारतीचा प्रश्न गंभीर बनल्यानंतर पालिकेमार्फत या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार ही इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने 27 ऑक्टोबर रोजी नगरपालिका प्रशासनाने इमारतीतील रहिवाशांना नोटीस काढून राहत असलेली खोली चौवीस तासांच्या आत खाली करण्याचे फर्मान काढले आहे.

खोल्यांच्या शोधासाठी न. प. कर्मचाऱयांची वणवण

  नगरपालिका प्रशासनाने इमारतीतील खोली तात्काळ खाली करण्याचे आदेश काढल्यानंतर या इमारतीतील चार सफाई कामगार व दोन कर्मचाऱयांनी लागलीच खोल्या शोधण्यास सुरुवात केली. परंतु आतापर्यंत या कर्मचाऱयांना राहण्यासाठी खोल्या मिळालेल्या नाहीत. या कर्मचाऱयांनी दुर्बल घटक निवासस्थानाच्या बाजूला असणाऱया समाज मंदिर राहण्यासाठी देण्यात यावी, अशी विनंती नगरपालिका प्रशासनाला केली होती. परंतु समाज मंदिरात स्पर्धा परीक्षेचे पेंद्र होणार असल्याने या ठिकाणी राहण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकत नसल्याचे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोमवारी सकाळी या सफाई कामगारांनी मालवण नगरपालिकेच्या व्यापारी गाळय़ांतील खोल्यांची पाहणी केली. सोमवारी रात्रीपर्यंत सफाई कामगारांची खोल्यांसाठी शोधमोहिम सुरू होती.

 कर्मचाऱयांची व्यथा न. प. प्रशासनापर्यंत पोहोचणार

 नगरपालिका प्रशासनाने इमारत धोकादायक असल्याची नोटीस काढून कर्मचाऱयांना खोल्या तात्काळ खाली करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या कर्मचाऱयांच्या राहण्याची कोणतीही सोय नगरपालिका प्रशासनाने केली नाही. त्यामुळे आता सकाळीच उठून शहरातील साफसफाईचे काम करायचे की खोल्या शोधायच्या? असा प्रश्न या कर्मचाऱयांना पडला आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन व नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींनी आमच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन खोल्यांची समस्या सोडविण्याची मागणी या कर्मचाऱयांनी केली आहे.

Related posts: