|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘एक खिडकी’ने साहसी जलक्रीडेच्या समस्या सुटतील?

‘एक खिडकी’ने साहसी जलक्रीडेच्या समस्या सुटतील? 

तारकर्ली, देवबागातील आरोग्य सुविधेचे तीन तेरा

जलक्रीडा प्रकारांवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का?

सहकाराचे महत्व जलक्रीडा व्यावसायिकांना कळणार?

संग्राम कासले / मालवण:

त्सुनामी आयलंड येथे साहसी जलपर्यटनाचा आनंद लुटताना चालकाचा ताबा सुटल्याने बनाना राईडवरील पर्यटकांच्या अंगावर जेट स्की गेल्याने दोघे पर्यटक गंभीर जखमी झाले. त्यानंतर तारकर्ली व देवबाग या दोन पर्यटन गावामंध्ये जलक्रीडा प्रकारांसाठी एक खिडकी सुरू करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये एक खिडकीबाबत मतभिन्नता दिसली. परंतु फक्त एक खिडकी राबवून जलक्रीडा प्रकाराशीसंबंधीत समस्या सुटणार आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मालवण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात येणाऱया पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांनी जलक्रीडा प्रकारांना सुरुवात केली. त्यामुळे मालवण किनारपट्टीवर जलक्रीडा पर्यटन मोठय़ा प्रमाणात बहरले. परंतु बहरलेल्या पर्यटनामुळे अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत. वाढत्या व्यावसायिक स्पर्धेमुळे जास्तीत जास्त पर्यटक आपल्याला मिळावेत, यासाठी जलक्रीडा व्यवसायाचे मार्केटींग केले जाते. यासाठी पर्यटकांच्या गाडय़ा अडवून त्यांच्या पाठीमागे लागण्याचा प्रकारही होतो. त्यामुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन लक्ष देणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तारकर्ली, देवबागमधील आरोग्य सोयींचे तीन तेरा

त्सुनामी आयलंड येथे पर्यटकांचा अपघात झाल्यानंतर जखमींना टेम्पो व रिक्षातून खासगी रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेच्या निमित्ताने देवबाग, तारकर्ली या गावांमधील आरोग्य सोयी-सुविधेचे तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट झाले. तारकर्ली, देवबाग या गावामंध्ये रुग्णवाहिका किंवा 108 रुग्णवाहिका उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. या घटनेनंतर सत्ताधारी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना जाग येऊन तारकर्ली किंवा देवबागमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्मितीसाठी ते पुढे सरसावणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जलक्रीडा प्रकारांवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का?

किनारपट्टीवर साहसी पर्यटन करण्यासाठी कितीजणांना परवानगी देण्यात आलेली आहे? किती प्रशिक्षित चालक जेट स्की आणि इतर साहसी वाहने चालवितात? त्यांच्याकडे परवाने आहेत का? मालवण किनारपट्टीवरील साहसी जलक्रीडा प्रकारांना शासन मान्यता आहे का? शासनाकडून सर्व बोटींना अगर व्यवसायाला अधिकृत परवानगी आहे का? या सर्व प्रश्नांवर जिल्हा प्रशासन गांभिर्याने पाहणार आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सहकाराचे महत्व व्यावसायिकांना समजणार का?

पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत सहकार रुजलेला आहे. सहकाराच्या जोरावर पश्चिम महाराष्ट्रात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. किनारपट्टीवर जलक्रीडा प्रकारात सुसुत्रता यावी, यासाठी तारकर्ली, देवबागमधील काही ग्रामस्थांनी एक खिडकीची संकल्पना मांडली. याबाबत जलक्रीडा व्यावसायिक सहमत होतील की नाही? हे येणारा काळच ठरवणार आहे. किनारपट्टीवरील रापण संघ, मालवण प्रवासी होडी वाहतूक ही सहकाराची आदर्श उदाहरणे आहेत. परंतु या सर्वांचा आदर्श इथले जलक्रीडा व्यावसायिक घेणार काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Related posts: