|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘राष्ट्रवादी’ सक्षम पर्याय निर्माण करणार!

‘राष्ट्रवादी’ सक्षम पर्याय निर्माण करणार! 

विद्यमान सरकारकडून जनतेची घोर निराशा : शेतकऱयांची फसवणूक – सुनील तटकरे

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आलेले शिवसेना-भाजपचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेच्या पदरी घोर निराशा आली आहे. शेतकऱयांची कर्जमाफी म्हणजे भुलभुलैय्या असून शेतकऱयांच्या तोंडाला  सरकारने पाने पुसली आहेत. सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न सोडवणार आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पर्याय निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या सोमवारी येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना केले.

 शेतकरी कर्जमाफीप्रमाणे मच्छीमारांनाही कर्जमाफी मिळावी, अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. सिंधुदुर्गात पक्ष संघटना मजबूत करून पक्ष एक नंबरला आणणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बांधणी कार्यक्रमानिमित्त येथील शरद कृषी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव, आमदार निरंजन डावखरे, पक्ष निरीक्षक विलासराव माने, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष व्हीक्टर डॉन्टस, युवक प्रदेश उपाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, युवक जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, जि. प. सदस्या, अनिषा दळवी, नंदकुमार घाटे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, अमित सामंत, बाळ कनयाळकर आदी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने 1999 पासून 2014 पर्यंत सत्तेमध्ये राहून जनतेची विकासकामे केली. मात्र गेल्या तीन वर्षांत शिवसेना-भाजपच्या युती सरकारने काहीच केलेले नाही. जनधन खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा होतील, असे केंद्र सरकारने जाहीर केले. मात्र 15 रुपये सुद्धा खात्यात जमा झालेले नाहीत. शरद पवार कृषीमंत्री असेपर्यंत भाताला प्रतिक्विंटल 1500 रुपयेपर्यंत दर मिळाला. परंतु गेल्या तीन वर्षांत काहीच वाढ झाली नाही. आपण अर्थमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा वार्षिक आराखडा नऊ कोटीवरून 90 कोटीवर नेला. कोकण रेल्वे मधु दंडवते यांनी आणली. परंतु त्यामध्ये शरद पवार यांचेही मोठे योगदान आहे. ते मुख्यमंत्री असताना कोकण रेल्वेसाठी भूसंपादन करून दिले होते, हे विसरता येणार नाही.

विद्यमान सरकारच बोगस आहे!

शेतकरी कर्जमाफीचा भुलभुलैय्या आहे. शेतकऱयांना बोगस कसे काय म्हणता? सरकारच बोगस असून कर्जमाफीचे श्रेय मिळण्यासाठी दिवाळीमध्ये घाईगडबडीत कर्जमाफीचे प्रमाणपत्र शेतकऱयांना देण्याचा कार्यक्रम घेतला. परंतु गेल्या आठ दिवसांत एकाही शेतकऱयाच्या कर्जमाफीसाठी एक रुपयाही जमा झाला नाही. कर्जमाफीचा कार्यक्रम घेणे हास्यास्पद आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना 71 हजार कोटीचे कर्ज माफ केले. पण त्यांनी कधी कार्यक्रम केला नाही. हे सरकार म्हणजे घोषणा देण्यात भारी हुषार आहे. ‘खोटं बोला, पण मजबूत रेटून बोला’, असे हे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी नंबर एकवर आणणार!

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून आपल्याला या जिल्हय़ात सहकार्य मिळाले नाही. परंतु, पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्याय निर्माण करेल. पक्ष संघटना मजबूत करणार व एक नंबरला आणणार. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीला सोबत घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे ते म्हणाले. सिंधुदुर्गात विकास ठप्प झाला असून महामार्गाचीही दुर्दशा झाली आहे. नारायण राणे व दीपक केसरकर एकमेकांनाच लक्ष्य करण्यात धन्यता माननात. त्यामुळे राष्ट्रवादीच रस्त्यावर उतरून जनतेची कामे करणार आहे, असे तटकरे म्हणाले.

महिला असुरक्षित चित्रा वाघ

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलगी अंगणात खेळत असली, तरी आपल्या मुलीचे काय होईल याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. या सरकारला गाईची काळजी आहे, पण महिला, मुलींची काळजी नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार पंधरा वर्षे सत्तेत असताना चांगली कामे करण्यात आली. ही कामे कार्यकर्त्यांनी जनतेसमोर नेली पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

नंदूशेठ घाटे यांनी मांडल्या व्यथा

राष्ट्रवादीचे नेते नंदूशेठ घाटे यांनी मालवणी शैलीत बोलताना पक्ष संघटनेत काम करताना येणाऱया अडचणी मांडत पक्ष निरीक्षकांबद्दल नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना वाऱयावर सोडू नका, असे ते म्हणाले.

जिल्हाध्यक्ष व्हीक्टर डॉन्टस, अबीद नाईक, प्रवीण भोसले यांनी जिल्हय़ातील विकास ठप्प झाल्याकडे लक्ष वेधत पक्ष संघटना मजबुतीचे आवाहन केले. नम्रता कुबल यांनी निवडणुकीवेळी येणाऱया अडचणी मांडल्या, तर पक्षनिरीक्षक विलासराव माने यांनी जुन्या कार्यकर्त्यांना प्रवाहात आणण्याची गरज विशद करून त्यासाठी प्रदेश पातळीवरून पाठबळ देण्यात यावे, असे आवाहन  केले.

दरम्यान या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱयांच्या अनुपस्थितीबाबत झाडाझडती घेत ज्यांना जबाबदारी नको, त्यांना दुसरी जबाबदारी देण्याच्या सूचना केल्या.

Related posts: