|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कर्जमाफीवर डोळा ठेवून अतिरिक्त कृषी कर्जाचा मेळ?

कर्जमाफीवर डोळा ठेवून अतिरिक्त कृषी कर्जाचा मेळ? 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शासनाच्या कृषी कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला असला तरी कर्जपुरवठा करणाऱया विकास सोसायटींकडून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रकार पुढे आला आहे. मंडणगड तालुक्यातील एका शेतकऱयाला याचा अनुभव आला असून कर्जमाफीवर डोळा ठेवत त्याच्या खात्यावर अतिरिक्त कृषी कर्ज दाखवण्याचा प्रताप विकास सोसायटीने केला आहे. या प्रकारास संबधित शेतकऱयाने त्यास विरोध करताच प्रकरण मिटविण्यासाठी अधिकाऱयांची कसरत सुरू आहे.

राज्यातल्या सहकारी पतसंस्था आणि सहकारी बँका या कर्ज व्यवहारांमध्ये अनेक उलट-सुलट नोंदी करतात,  लेखा परिक्षणात सापडू नये म्हणून चतुराई दाखवतात. या खटपटी-लटपटींच्या आधारे संस्था टिकवतात, असा समज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱयांचा झाला असून त्यामुळे अधिक बंधने या संस्थावर घालण्यात येत आहे. मंडणगडात एका विकास सोसायटीमध्ये असाच प्रकार पुढे आला आहे.

1 लाखाच्या ऐवजी 2 लाख कर्ज या शेतकऱयाच्या खात्यावर दिसू लागले. पुढे कर्जमाफीची घोषणा झाली. यामुळे कर्ज देणाऱया व चलाखी करणाऱया अधिकाऱयांच्या तोंडाला पाणी सुटले. यावेळी राज्य सरकारने ‘आधार’ आधारीत कर्जमाफी योजना काढल्यामुळे अतिरिक्त कर्जमाफी रकमेची बँकांची मागणी मंजूर होणे शक्यच नव्हते. जुन्या कागदपत्रांवर आणि आधार कार्डावर माफी रक्कम ठरत होती.

संबंधित शेतकऱयाने जेवढे कर्ज घेतले होते, तेवढेच माफ झाले. तथापि, तांत्रिकदृष्टय़ा दाखवण्यात आलेले अतिरिक्त कर्ज माफ कसे होणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. संबंधित शेतकऱयांने अधिकाऱयांना सांगितले की, माझ्या नावावर तुम्ही अतिरिक्त कर्ज दाखवले आहे. कर्जमाफीवर डोळा ठेवून, तुम्ही हे केले आहे. त्याला जबाबदार मी नाही. जी रक्कम घेतली नाही, ती मी फेडणार नाही.

अधिकाऱयांनी वाद वाढू नये, याची काळजी घेतली. तुम्ही कुठे तक्रार करु नका, पैशाचे आम्ही बघतो, असे हे अधिकारी सांगत आहेत. यामुळे शेतकरी हबकला असला तरी अधिकाऱयांवर विश्वास ठेवून आहे. मंडणगडात एका शेतकऱयाच्या बाबतीत हा प्रकार घडत असला तरी प्रत्यक्षात जिह्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Related posts: