|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलीस निवासस्थानांसाठी 4.47 कोटी

पोलीस निवासस्थानांसाठी 4.47 कोटी 

वार्ताहर/ निपाणी

पोलीस कर्मचारी हे समाजाला सुरक्षा पुरवितात. अशा पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांची निवासस्थाने ही सर्वसोयीनियुक्त व सुसज्ज असायला हवीत. यासाठी सन 2014 पासून पोलीस निवासस्थान मंजुरीसाठी आपले अविरत प्रयत्न सुरू होते. यासाठी अनेकवेळा अधिवेशनात आवाज उठवून लक्ष वेधले होते. राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्याकडेही निधीसाठी पाठपुरावा केला होता. या सर्व प्रयत्नांना नुकतेच यश मिळाले असून निवासस्थाने उभारणीसाठी 4.47 कोटीचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली.

येथील मुरगूड रोडवरील बिरेश्वर संस्था कार्यालयात सोमवारी पत्रकार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी बंडा उर्फ सिद्धार्थ घोरपडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी सहकारनेते आण्णासाहेब जोल्ले, शहर भाजपा अध्यक्ष जयवंत भाटले, आकाश शेट्टी, प्रणव मानवी, अशोक राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शशिकला जोल्ले पुढे म्हणाल्या, निपाणी शहर, निपाणी ग्रामीण व बसवेश्वर चौक अशी तीन पोलीस ठाणी व एक सीपीआय कार्यालय निपाणी विभागात येते. येथील पोलीस कर्मचाऱयांसाठी असणारी शासकीय निवासस्थाने अनेक वर्षापासून दुर्दशेच्या गर्तेत अडकली होती. यासाठी या निवासस्थानांसाठी आपण पाठपुरावा करत होतो. याला यश मिळाले आहे. 7 एकर 11 गुंठे क्षेत्रात 24 निवासस्थाने उभारण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे.

अग्निशामक दल इमारतीचे उद्घाटन लवकरच

निपाणी शहर हे राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले शहर आहे. येथे कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, व्यावसायिक प्रगती होत आहे. तालुक्याचा दर्जा प्राप्त करणाऱया शहरात अग्निशामक दलसेवा मात्र उपलब्ध नव्हती. यामुळे अनेक समस्या उद्भवत होत्या. यासाठी अग्निशामक दलाला मंजुरी मिळवत सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. या दलासाठी इमारत व कर्मचाऱयांसाठी निवासस्थानही उभारण्यात आले असून या कामाचेही लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे, असे सांगितले.

16 ते 20 दरम्यान प्रेरणा उत्सव

याप्रसंगी सहकारनेते आण्णासाहेब जोल्ले म्हणाले, 20 नोव्हेंबर रोजी आमदार शशिकला जोल्ले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीपेवाडी रोड नांगनूर येथील सिद्धोजीराजे महाविद्यालय परिसरात 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान प्रेरणा उत्सव होणार आहे. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, व्याख्याने, सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत, असे सांगितले.

Related posts: