|Friday, April 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उद्या होणार मराठी भाषिकांचा एल्गार

उद्या होणार मराठी भाषिकांचा एल्गार 

काळय़ादिनी प्रचंड मूक सायकल फेरी, महाराष्ट्रातील नेते मंडळी सहभागी होणार  शांततेने फेरीत सहभागी होण्याचे आवाहन

प्रतिनिधी / बेळगाव

1 नोव्हेंबर 1956 पासून अन्यायाच्या जोखडात पिचत असलेल्या सीमाबांधवांचा एल्गार बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा दिसून येणार आहे. काळय़ादिनी निघणाऱया भव्य सायकल फेरीत प्रचंड संख्येने सहभागी होऊन आपल्या ज्वलंत भावनांचे दर्शन घडविण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. कर्नाटक सरकारच्या जुलमी कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच भाषिक प्राबल्य असतानाही कर्नाटकात डांबणाऱया केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांना विरोध करण्यासाठी पुन्हा एकवार मराठी बांधव एकवटले असून काळादिन गांभीर्याने पाळला जाणार आहे.

काळय़ादिनी निघणाऱया मूक मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, म. ए. समिती महिला आघाडी, शिवसेना, मराठी भाषिक युवा आघाडी आदी संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे. बुधवार दि. 1 रोजी सकाळी 9 वाजता संभाजी उद्यान येथून मूकफेरीला सुरुवात होणार आहे. रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे सायकल फेरीची सांगता होणार असून या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सीमावासीयांना पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्राचे आमदार नितेश राणे तसेच महाराष्ट्रातील इतर पक्षांचे नेते यावेळी उपस्थित राहणार असून सायकलफेरीच्या सांगतेनंतर घेण्यात येणाऱया सभेमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत.

62 वर्षे अन्याय सोसत कर्नाटकात राहत असल्याचे दु:ख सीमावासीयांना आहे. काळय़ादिनी सीमावासीय आपापले व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळतात. आबालवृद्ध मूक सायकलफेरीत सहभागी होऊन आपल्या ज्वलंत भावनांचे दर्शन घडवितात. युवावर्ग व बालचमुंचाही सहभाग उत्साह वाढविणारा असतो. यंदाही प्रचंड संख्येने मूक सायकलफेरी काढण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करणारे फलक, दंडाला काळय़ा फिती, अंगावर काळी वस्त्रs परिधान करून मराठी बांधव मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी होणार आहेत.

प्रचंड संख्येने सहभागी व्हा

कर्नाटक आणि केंद्र सरकारच्या विरोधातील भावना प्रकट करण्यासाठी सीमावासीयांनी आपले व्यवहार बंद ठेवून मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर, महापौर संज्योत बांदेकर,  आमदार संभाजी पाटील, उपमहापौर नागेश मंडोळकर, उपाध्यक्ष टी. के. पाटील, चिटणीस किरण गावडे, तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सरचिटणीस मनोज पावशे आदींनी केले आहे.

काळय़ादिनी सायकलफेरीत मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे. अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर तसेच इतर पदाधिकाऱयांनी हे आवाहन केले आहे. 

मूक सायकलफेरीत महिलांनी जास्तीत जास्त संख्येने काळय़ा साडय़ा परिधान करून सहभागी व्हावे व महिलांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी केले आहे.

सायकल फेरीचा मार्ग

धर्मवीर संभाजी उद्यान येथून मूक सायकल फेरीची सुरुवात होणार आहे.  एसपीएम रोड, बसवाण गल्ली होसूर, पी. बी. रोड, नार्वेकर गल्ली शहापूर, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, बसवाण गल्ली, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल, खानापूर रोड, आरपीडी कॉलेज कॉर्नर, सी.डी.देशमुख रोड, शुक्रवारपेठ रोड, गोवावेसमार्गे मराठा मंदिर येथे सायकलफेरीची सांगता होईल व या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.

 

Related posts: