|Wednesday, June 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » एल्फिन्स्टनचा पूल जवान बांधणार

एल्फिन्स्टनचा पूल जवान बांधणार 

करी रोड, आंबिवली स्थानकावरीलही पूल उभारणार   येत्या 31 जानेवारीपर्यंत काम पूर्ण होणार

प्रतिनिधी/मुंबई

एल्फिन्स्टन रोड पुलावर 29 सप्टेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन 23 निष्पाप जीवांचा बळी गेला होता. या दुर्घटनेला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. या परिसराची सध्याची परिस्थिती काय आहे याची पाहणी मंगळवारी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण, रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी एल्फिन्स्टन रोडवरील पादचारी पुलासह मध्य रेल्वेवरील करी रोड आणि आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांची बांधणी भारतीय सैन्य दलाचे जवान बांधणार आहेत. हे पूल 31 जानेवारी 2018 पर्यंत पूर्ण केले जातील, असे आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिले. 

नेहमीच्या कार्यपद्धतीने येथे नवीन पूल बांधायचे काम हाती घेतले असते तर त्यास खूप कालावधी लागला असतो. भारतीय लष्कराकडे या पुलांचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचे कौशल्य असल्याने संरक्षण मंत्रालयाकडे हे काम करण्याची विनंती केली होती. संरक्षण मंत्रालयाने ही विनंती मान्य केल्यानंतर एल्फिन्स्टन रोड येथील पुलासोबतच करी रोड आणि आंबिवली रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलांचे कामही लष्कराकडून केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यांनी यावेळी सांगितले.

 एल्फिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीनंतर भारतीय सैन्याकडून पूल बांधण्यासाठी मदत करावी अशी महाराष्ट्र सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे केलेली विनंती लक्षात घेऊन लष्कराने हे काम करावे असे ठरविण्यात आले. सैन्यदलाकडून लष्करी कामासाठी तसेच आपत्तीr काळामध्ये अशी बांधकामे होत असतात. मात्र लष्कराकडून बांधकाम होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सीतारमण म्हणाल्या. 

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर उपनगरीय रेल्वे स्थानकांची पाहणी केल्यानंतर कोणत्या उपाययोजना करता येतील, आवश्यक सुधारणांबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. लष्कर देशाच्या संरक्षणासाठी सतत तत्पर असतेच मात्र या पुलांच्या कामानिमित्ताने राष्ट्रबांधणीचे काम हाती घेऊन एक नवा आदर्श घालून दिला असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले.

या पुलांच्या बांधणीसाठी 6 ऑक्टोबर रोजी संरक्षणमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांना भेटून मुंबईकरांच्यावतीने विनंती केली होती. या विनंतीला 24 दिवसांत मूर्त स्वरूप दिल्याचे ट्विट आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.

Related posts: