|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ल्यात दोन दुकाने आगीत खाक

वेंगुर्ल्यात दोन दुकाने आगीत खाक 

प्रतिनिधी/ वेंगुर्ले

शहरातील राऊळवाडा येथील उदय गोपाळ गावडे यांच्या मानसीश्वर ऑईल सेंटरला मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन दुकान गाळय़ातील ऑईल, स्पेअरपार्ट, टायर आदी साहित्य आगीत खाक झाले. यात सुमारे 24 लाख रुपयांचे नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थांनी फायर सिलिंडर व पाण्याच्या साहय़ाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे बाजूचे पाच दुकान गाळे बचावले.

राऊळवाडा येथील मानसीश्वर ऑईल सेंटरचे मालक उदय गोपाळ गावडे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून जेवणासाठी घरी गेले. दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास मानसीश्वर ऑईल सेंटरच्या दोन गाळय़ांपैकी एका गाळय़ातून आगीच्या ज्वाला बाहेर येत असल्याचे लगतचे रहिवासी प्रीतम वाडेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची कल्पना इतरांना देताच अजित परब, कांता मुणनकर, शैलेश पाटील, गौरी पाटील, गणेश शिरसाट, प्रसाद खानोलकर, प्रमोद वेर्णेकर, शेखर होडावडेकर, निखिल नाईक व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अजित परब यांच्याकडील फायर सिलिंडर व पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. न. प. चा बंबही बोलावण्यात आला. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. दोन गाळय़ांमध्ये ऑईलचा साठा असल्याने हे दोन गाळे व त्यातील साहित्य आगीत खाक झाले.

या आगीत व्हिडॉल, कॅस्ट्रॉल, मोट्रट आदी कंपन्यांचे सात लाख रुपये किमतीचे 2000 लिटर ऑईल, अपोलो, टीव्हीएस, एमआरएफ, सीएट कंपनीचे साडेतीन लाख रुपये किमतीचे दोनचाकी व चारचाकी वाहनांचे 60 टायर, 13.50 लाख रुपयांचे विविध कंपन्यांचे स्पेअर पार्ट, 95 हजार रुपये किमतीचे दोन संगणक, प्रिंटर व इतर साहित्य, कागदपत्रे जळून सुमारे 24 लाख रुपयांचे नुकसान झाले.

तहसीलदार शरद गोसावी, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, नगरसेवक संदेश निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. तलाठी व मंडल अधिकारी तुळसकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला.