|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तालुका पंचायत कार्यालयावर स्पीकरवरून नाडगीत लावून आदेशाचे उल्लंघन

तालुका पंचायत कार्यालयावर स्पीकरवरून नाडगीत लावून आदेशाचे उल्लंघन 

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यास प्रशासनाला घाई झाल्याचे दिसून येत आहे. दोन-चार दिवसांपूर्वीच शहर व परिसरात स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तर सरकारी कार्यालयासमोर लाल-पिवळे ध्वज आणि पताका लावण्यासाठी मंगळवारपासूनच चढाओढ सुरु होती. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असणाऱया तालुका पंचायत कार्यालयासमोरही अशीच घाई मंगळवारी सकाळपासून सुरु होती. यावर कहर म्हणजे ता. पं. कार्यालयावर लाऊड स्पीकर लावून त्यावर नाडगीत (राज्यगीत) लावून नियमांचे उघडपणे उल्लंघन करण्यात येत होते. मात्र याकडे कोणत्याही सरकारी अधिकाऱयाचे लक्ष गेले नाही हे विशेष!

राज्योत्सव साजरा करण्याच्या उत्साहाच्या भरात तालुका पंचायत कार्यालया समोर लाल-पिवळय़ा पताका लावण्याचे काम सुरु होते. तर कार्यालयावरच स्पीकर लावून नाडगीतही लावण्यात आले होते. मात्र प्रशासनाने हे नाडगीत सर्व कार्यालयात बैठकींच्या प्रारंभी लावण्यास सांगण्यात आले आहे. तसेच नाडगीत सुरु असताना सर्वांनी उभे रहावे, असा आदेश दिला आहे. मात्र मंगळवारी ता. पं. कार्यालयावर लावण्यात आलेल्या स्पीकरवरून हे नाडगीत लावून प्रशासनाच्या आदेशालाच वाटाण्याचा अक्षता लावण्यात आल्या आहेत.  सरकारी कामकाजा दिवशी सरकारी कार्यालयावर अशाप्रकारे स्पीकर लावून शांतता भंग करण्याचा विशेष अधिकार ता. पं. च्या अधिकाऱयांना देण्यात आला होता का? असा प्रश्नही  विचारण्यात येत आहे.

Related posts: