|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आज काळय़ादिनी भव्य मूकफेरी

आज काळय़ादिनी भव्य मूकफेरी 

सकाळी मूक सायकल फेरीचे आयोजन  : फेरीनंतर होणार सभा, आमदार नितेश राणे, महाराष्ट्रातील नेते मंडळी सहभागी होणार :

प्रतिनिधी / बेळगाव

केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांना विरोध आणि दडपशाहीचे धोरण राबविणाऱया कर्नाटकाचा निषेध करण्यासाठी आज बेळगाव शहरात काळा दिन गांभीर्याने पाळला जाणार आहे. आपापले व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळत सीमावासीय मूक सायकल फेरीत सहभागी होणार आहेत. आमदार नितेश राणे तसेच महाराष्ट्रातील नेते मंडळी सायकलफेरीत उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सभा घेवून आपला मूक हुंकार सीमावासियांच्यातर्फे मांडला जाणार आहे.

1 नोव्हेंबर 1956 पासून अन्यायाच्या जोखडात पिचत असलेल्या सीमाबांधवांचा एल्गार बुधवारी पुन्हा एकदा दिसून येणार आहे. काळय़ादिनी निघणाऱया भव्य सायकल फेरीत प्रचंड संख्येने सहभागी होऊन आपल्या ज्वलंत भावनांचे दर्शन घडविण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. काळय़ादिनी निघणाऱया मूक मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, म. ए. समिती महिला आघाडी, शिवसेना, मराठी भाषिक युवा आघाडी आदी संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून मूक फेरीस परवानगी

बुधवार दि. 1 रोजी सकाळी 9 वाजता संभाजी उद्यान येथून मूक फेरीला सुरुवात होणार आहे. पोलीस प्रशासनाने अनेक अटी घालून या मूक सायकल फेरीस परवानगी दिली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला मंगळवारी दुपारी परवानगीचे पत्र देण्यात आले आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 1 या काळात फेरी संपवावी, कोणत्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये, दुचाकीस्वारांनी रहदारीचे नियम मोडू नयेत, दोन भाषिकांत तेढ निर्माण होईल, अशा घोषणा व भाषण करू नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

 रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे सायकल फेरीची सांगता होणार असून या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सीमावासियांना पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्राचे आमदार नितेश राणे तसेच महाराष्ट्रातील इतर पक्षांचे नेते यावेळी उपस्थित राहणार असून सायकल फेरीच्या सांगतेनंतर घेण्यात येणाऱया सभेमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत.

हरताळ पाळून सहभागाचे आवाहन

62 वर्षे अन्याय सोसत कर्नाटकात राहत असल्याचे दु:ख सीमावासीयांना आहे. काळय़ादिनी सीमावासीय आपापले व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळतात. आबालवृद्ध मूक सायकलफेरीत सहभागी होऊन आपल्या ज्वलंत भावनांचे दर्शन घडवितात. युवावर्ग व बालचमुंचाही सहभाग उत्साह वाढविणारा असतो. यंदाही प्रचंड संख्येने मूक सायकलफेरी काढण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करणारे फलक, दंडाला काळय़ा फिती, अंगावर काळी वस्त्रs परिधान करून मराठी बांधव मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी होणार आहेत. समितीच्यावतीने तसे आवाहन करण्यात आले आहे.

कर्नाटक आणि केंद्र सरकारच्या विरोधातील भावना प्रकट करण्यासाठी सीमावासीयांनी आपले व्यवहार बंद ठेवून मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर, महापौर संज्योत बांदेकर,  आमदार संभाजी पाटील, उपमहापौर नागेश मंडोळकर, उपाध्यक्ष टी. के. पाटील, चिटणीस किरण गावडे, तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सरचिटणीस मनोज पावशे व शहापूर विभाग समितीच्यावतीने माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी केले आहे.

काळय़ादिनी सायकलफेरीत मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे. अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर तसेच इतर पदाधिकाऱयांनी हे आवाहन केले आहे. मूक सायकलफेरीत महिलांनी जास्तीत जास्त संख्येने काळय़ा साडय़ा परिधान करून सहभागी व्हावे व महिलांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी केले आहे.

प्रशासनाने परवानगी दिलेला मार्ग

सकाळी 9.30 वाजता धर्मवीर संभाजी उद्यान येथून मक सायकल फेरीची सुरुवात होणार आहे. फुलबाग गल्ली रेल्वे ट्रक, भांदुर गल्ली, हेमुकलानी चौक, रेल्वे स्टेशन रोड, अंबाभुवन, शिवाजी रोड, रामलिंगखिंड गल्ली, हेमुकलानी चौक, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर, रेल्वे उड्डाणपूल, एस.पी.एम. रोड, बसवाण गल्ली होसूर, ओल्ड पी. बी. रोड, नार्वेकर गल्ली शहापूर, आचार्य गल्ली-गाडेमार्ग, सराफ गल्ली, खडेबाजार शहापूर, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल, गोवावेसमार्गे मराठा मंदिर येथे सायकलफेरीची सांगता होईल व या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.

स्वयंघोषित पीआरओंकडून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न

काळय़ा दिनाच्या मूक फेरीला मंगळवारी दुपारी परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोमवारीच एका स्वयंघोषित पीआरओंकडून माध्यमांना चुकीची माहिती देवून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न झाला आहे. नव्या परवानगीनुसार शिवाजी रोड येथून हेमुकलानी चौकाकडे जाताना रामलिंगखिंड गल्लीच्या काही भागातून फेरी जाणार आहे. मात्र फेरी रामलिंगखिंड गल्लीपर्यंत असे सांगून अकारण गोंधळ माजविण्याचा प्रयत्न झाला आहे. याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

मराठी भाषिक नगरसेवकांनी

काळय़ादिनाच्या फेरीत सहभागी व्हावे

केंद्र शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांना कर्नाटकात डांबून अन्याय केला. केंद्र शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी दि. 1 रोजी आयोजित करण्यात येणाऱया काळय़ादिनाच्या फेरीत मराठी भाषिक नगरसेवकांनी सहभागी होण्याचे आवाहन सत्ताधारी गटनेते पंढरी परब आणि आमदार संभाजी पाटील यांनी केले आहे.

 मराठी भाषिक आजी-माजी नगरसेवकांनी काळय़ादिनाच्या फेरीत आणि सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंढरी परब आणि आमदार संभाजी पाटील, माजी महापौर महेश नाईक, माजी महापौर किरण सायनाक, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणु मुतकेकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, ऍड. रतन मासेकर, नगरसेवक अनंत देशपांडे, विजय पाटील आदांनी केले आहे. 

सीमाभाग बेळगाव शिवसेनेचे आवाहन

बुधवार दि. 1 नोव्हेंबर काळय़ा दिनी सीमाभागातील आजी-माजी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, सीमाबांधव यांनी सकाळी 8 वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, रामलिंगखिंड गल्ली येथे उपस्थित रहावे. त्यानंतर 9 वाजता मुख्य सायकल फेरीमध्ये सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, रिक्षा सेना विजय मुरकुटे यांनी केले आहे.

 

Related posts: