|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पालकंत्र्यांच्या पराभवाचे ईश्वरी संकेत!

पालकंत्र्यांच्या पराभवाचे ईश्वरी संकेत! 

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा टोला

केसरकरांनी प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱयांना अद्याप कर्जमाफी नाहीच

वार्ताहर / कणकवली:

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर हे आपले मंत्रीपद टिकवून ठेवण्यासाठी नारायण राणेंवर टीका करीत आहेत. ज्या केसरकरांनी ईश्वरी संकेताची भाषा केली आहे, त्या पालकमंत्र्यांना त्यांच्या सावंतवाडी मतदारासंघातील जनतेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे ईश्वरी संकेत दिले आहेत. तसे संकेत जि. प., पं. स. व नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीतून मिळाले आहेत. केवळ मांत्रिक बाबावर विश्वास ठेवून काम करणाऱया केसरकर यांच्यात जिल्हय़ाचा विकास करण्याची धमकच नाही. निवडणुकींच्या काळात सावंतवाडी मतदारसंघात लिंबू- टाचण्यांचे व कोहाळे कापल्याचे प्रकार दिसून येतात. तो मांत्रिक बाबा पालकमंत्र्यांच्याच गाडीतून फिरत असतो, असा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे केला.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, शरद कर्ले आदी उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, केसरकर यांनी आतापर्यंत केलेल्या घोषणांचा आढावा घ्यावा. आंबोली रस्ता, फुलपाखरू गार्डन, सी-वर्ल्ड, बंदर विकास आदी प्रकल्पांच्या बाबतीत त्यांनी केलेल्या घोषणा आठवाव्यात. चांदा ते बांदा योजनेंतर्गत सूक्ष्म नियोजनाच्या व्यतिरिक्त केसरकर यांनी काहीच केले नाही. त्यांनी आता पोपटपंची थांबवावी.

सतीश सावंत म्हणाले, प्रसादाची बॅग घेऊन फिरत असलेल्या केसरकर यांच्याकडील प्रसाद घ्यायलाही त्यांच्या सोबतचे सहकारी घाबरतात. जिल्हा विकासासाठी मांत्रिकाच्या मदतीची नाही, तर अंगात धमक हवी. ती नारायण राणे यांच्याकडे आहे. राणेंची ताकद केसरकर यांना येत्या काळात दिसेल. न पेक्षा केसरकरांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारावे. शिवसेनेच्या वाढीसाठी पालकमंत्र्यांचा काहीच उपयोग नाही.

राणेंवर टीका करून मातोश्रीवर स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केसरकर करीत आहेत. राणे द्वेषामुळे केसरकरांना आतापर्यंत पदे मिळाली. हायवेच्या दूरवस्थेला केसरकर जबाबदार आहेत. हायवेच्या ठेकेदारांना काळ्य़ा यादीत टाकण्याची घोषणा करणाऱया केसरकरांना ग्रा. पं.च्या ठेकेदारालाही काळ्य़ा यादीत टाकण्याचा अधिकार नाही. हायवेच्या खड्डय़ांमुळे केसरकर यांनी हायवेवर वेदनाशामक औषधांचे स्टॉल उभारावेत. जिल्हा नियोजनमधील 130 कोटीतील 30 कोटी निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला वळविण्यात आला आहे. त्यामुळे जि. प. च्या रस्त्यांना निधी कमी प्रमाणात मिळणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

कर्जमाफीच्या रकमेतील 1 कोटी 65 लाख रक्कम जिल्हा बँकेकडे जमा झाली असून ज्या 20 शेतकऱयांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र केसरकर यांनी दिले होते, त्या वीसही शेतकऱयांची रक्कम अद्याप जमा झाली नाही. त्यामुळे केसरकर यांचा हातगुण दिसून आला आहे. यामुळे पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचेही सिद्ध झाले आहे. केसरकर यांच्यात हिंमत असेल तर लगेचच प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱयांचे पैसे जमा करून दाखवावेत, असे आव्हान सावंत यांनी दिले आहे.

आतापर्यंत ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाच्या ग्रा. पं. जास्त असे संकेत असताना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक व पालकमंत्री यांच्या बाबतीत मात्र जिल्हय़ात गणित उलट झाले आहे. सावंतवाडीत 103 पैकी 15 शिवसेना, मालवण – कुडाळमध्ये 106 पैकी 26 शिवसेना, तर नीतेश राणेंच्या कणकवली मतदारसंघात 120 पैकी 85 ग्रा. पं. समर्थ विकास पॅनेलच्या आल्या. त्यामुळे राणेंवर टीका करणाऱया राऊत, वैभव नाईक यांनी कोणाची ताकद कमी झाली, याचे आत्मपरिक्षण करावे, असेही सावंत यांनी सांगितले. केंद्राचा जिल्हय़ात निधी येत नाही, रस्ते सुस्थितीत नाहीत, रुग्णालयांमध्ये डॉक्टर नाहीत, असे असताना केवळ राणेंवर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम राऊत व नाईक यांनी सुरू केल्याचा आरोप सावंत यांनी केला.

Related posts: