|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बंदर विभागाने जलक्रीडा प्रकल्पांना परवाने देऊ नये

बंदर विभागाने जलक्रीडा प्रकल्पांना परवाने देऊ नये 

श्रमजीवी रापण संघाचा इशारा

निवेदन देऊनही प्रश्न न सुटल्यास संघर्ष अटळ!

वार्ताहर / मालवण:

 मासेमारी अधिनियम 1981 अंतर्गत 0 ते 10 वाव क्षेत्रात पारंपरिक क्षेत्र मासेमारीकरिता राखीव ठेवण्याची महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभाग याद्वारे कायदेशीर तरतूद केलेली आहे. त्यामुळे बंदर विभागाने जलक्रीडेतील 16 प्रकल्पाच्या प्रस्तावांना कोणतीही परवाना देऊ नये, अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघातर्फे बंदर विभागाला देण्यात आले आहे. निवेदन देऊनही समस्या न सुटल्यास रापण संघ संघर्षासाठी सज्ज असल्याचा इशारा उपस्थित रापण संघांनी दिला आहे.

 बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी, मालवण श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, मेस्त रापण संघ, तोडणकर रापण संघ, वाईरकर रापण संघ, भगत रापण संघ, टिकम रापण संघ, कुबल रापण संघ, उभाटकर रापण संघ, झाड रापण संघ आदी रापण संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  जलक्रीडेचे मासेमारीवर दुष्परिणाम

 छोटू सावजी म्हणाले, जलक्रीडा प्रकल्प हे 0 ते 12 वाव क्षेत्रात वॉटर स्पोर्टस् व पॅरासेलिंग या जलक्रीडा राबविल्या जाणार आहेत. परंतु यापूर्वी किनारपट्टी क्षेत्रातील स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी स्थानिक विभागीय कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीला अनुसरून या क्षेत्रात रापण, गिलेटीन, मांड, टियाणी व गळ पद्धतीची मासेमारी आजही अस्तित्वात आहे. या व्यवसायावर या क्षेत्रात हजारो कुटुंबे आपला उदरनिर्वाह चालवितात. जलक्रीडा प्रकल्पांतर्गत वापरली जाणाऱया साधनांमुळे मासेमारी क्षेत्रात ध्वनी प्रदूषण, सागरी जैवविविधता प्रदूषण व रोजगार या बाबींवर दुष्परिणाम होणार असून हे क्षेत्र केंद्रीय तटवर्तीय मासेमारी व महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत कायदेशीर राखीव असून या क्षेत्रात मासेमारी व्यतिरिक्त इतर कोणत्याही यांत्रिक संसाधनाने औद्योगिक किंवा वाणिज्य स्वरुपात उद्योग किंवा सेवा उद्योग करण्यास मनाई आहे.

 परवाने नसतानाही जलक्रीडेचा व्यवसाय कसा?

  छोटू सावजी म्हणाले, मालवण किनारपट्टीवर परवाने नसतानाही जलक्रीडेचे प्रकार होत आहेत. देवबाग दुर्घटनेसारखा एखादा प्रकार झाल्यास त्याला जबाबदार कोण? यावेळी बंदर निरीक्षक कुमठेकर यांनी किनारपट्टीवरील जलक्रीडा व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांनी परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. परवाना मिळण्यासाठी त्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले. जलक्रीडा व्यवसायाबाबत रापण संघांतील मच्छीमारांच्या भावना आपण अहवालाच्या माध्यमातून बंदर विभागाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविणार आहोत. येत्या आठ दिवसांत याविषयीचा पाठपुरावा केला जाईल.