|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » रणजीत महाराष्ट्र 245 धावांत गारद

रणजीत महाराष्ट्र 245 धावांत गारद 

कर्नाटकच्या विनयकुमारचे सहा बळी, राहुल त्रिपाठीचे झुंजार शतक

पुणे / प्रतिनिधी

पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विरूद्ध कर्नाटक यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर कर्नाटकच्या विनय कुमारच्या अचूक माऱयापुढे महाराष्ट्राचा डाव 245 धावांवर संपुष्टात आला. विनय कुमारने 14 षटकांमध्ये 59 धावा देत 6 गडी बाद केले. कर्नाटकने आजच्या दिवसअखेर बिनबाद 117 धावा केल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसावर पूर्णपणे कर्नाटकचे वर्चस्व राहिले आहे.

कर्नाटकने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. महाराष्ट्राच्या डावाची सुरूवात खराब झाली. पाचव्या षटकातच विनय कुमारने स्वप्नीलचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राला पहिला धक्का दिला. यावेळी धावफलकावर महाराष्ट्राच्या केवळ 10 धावा होत्या. यानंतर 8 षटकांत पुन्हा विनय कुमारने ऋतुराज गायकवाडला बाद करत महाराष्ट्राला दुसरा धक्का दिला. त्यानंतर हर्षद खडीवाले, कर्णधार अंकित बावणे आणि राहुल मोटवानीदेखील झपटपट बाद झाले. 13 षटकातच महाराष्ट्राची 5 बाद 28 अशी दयनीय अवस्था झाली. त्यानंतर आलेल्या नौशाद शेख आणि राहुल त्रिपाठी यांनी महाराष्ट्राचा डाव सावरला. राहुलने शतकी खेळी करत महाराष्ट्राला 200 धावांचा पल्ला पार करून दिला. त्याने 114 चेंडूत 13 चौकार 3 षटकारांच्या मदतीने 120 धावा पटकावल्या. त्याला नौशाद शेखने चांगली साथ दिली. त्याने 105 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 69 धावा केल्या. यानंतर मात्र महाराष्ट्राच्या एकाही फलंदाजाला कर्नाटकच्या माऱयाचा प्रतिकार करता आला नाही. यामुळे महाराष्ट्राचा डाव 245 धावांत गारद झाला.

कर्नाटककडून विनय कुमारने 14 षटकांत 59 धावा देत 6 गडी बाद करत महाराष्ट्राच्या फलंदाजीचा कणा मोडून काढला. पवन देशपांडेने 7 षटकांत 38 धावा देत 2 गडी बाद केले. तर अभिमन्यू मिथुन आणि स्टुअर्ट बिनीने प्रत्येकी  1 गडी बाद केला. गोलंदाजीत कमाल केल्यानंतर फलंदाजीतदेखील मयांक अगवाल, रविकुमार समर्थ यांनी कर्नाटकच्या डावाची शतकी सुरूवात करून दिली. आजच्या पहिल्या दिवसअखेर कर्नाटकच्या बिनबाद 117 धावा झाल्या होत्या.  आता यातून महाराष्ट्राला सामन्यात कमबॅक करायचे असेल, तर उद्याच्या पहिल्या सत्रात त्यांना चांगली गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करून कर्नाटकला कमीत कमी धावात रोखावे लागेल. त्याचबरोबर दुसऱया डावात आघाडीच्या फलंदाजांना मोठी खेळी करावी लागणार आहे.

Related posts: