|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » रिझवी, पूजा घाटकर यांना सुवर्ण

रिझवी, पूजा घाटकर यांना सुवर्ण 

वृत्तसंस्था / ब्रिस्बेन

पुरुषांच्या 10 मीटर्स एअर पिस्तोल गटात शाहझर रिझवी व महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये पूजा घाटकर यांनी सुवर्णपदके संपादन केल्यानंतर येथील राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारताची यशस्वी घोडदौड कायम राहिली. 10 मीटर्स एअर पिस्तोल इव्हेंटची सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी तिन्ही पदके भारतानेच जिंकली, हे देखील दिवसभरातील ठळक वैशिष्टय़ ठरले. या गटात शाहझरने सुवर्ण, ओंकार सिंगने रौप्य तर जितू रायने कांस्यपदकाची कमाई केली.

महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल गटात पूजा घाटकरने सुवर्ण जिंकले तर राष्ट्रीय सहकारी अंजुम मुदगिलने रौप्यपदकावर आपली मोहोर उमटवली. या इव्हेंटमधील कांस्यपदक सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे व्हेलोसोने जिंकले. अंतिम फेरीत पोहोचणारी आणखी एक भारतीय नेमबाज मेघना सज्जण्णावरला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.

युवा नेमबाज रिझवीने दिवसाच्या प्रारंभीच भारताला सोनेरी यश संपादन करुन दिले. प्रारंभी, 16 स्पर्धकांच्या पात्रता फेरीत त्याने 581 अंकांसह अव्वलस्थान प्राप्त केले. ओंकार व जितू राय यांनीही अनुक्रमे 576 व 571 अंकांसह 8 स्पर्धकांच्या अंतिम लढतीतील आपले स्थान निश्चित केले. नंतर फायनलमध्ये देखील हीच क्रमवारी थोडय़ाशा फरकाने कायम राहिली. वास्तविक, पहिल्या 5 फटक्यांच्या सिरीजमध्ये जितू राय आघाडीवर होता. ओंकार त्यावेळी दुसऱया व शाहझर तिसऱया स्थानी होता. ओंकार नंतर 18 व्या प्रयत्नापर्यंत आघाडीवर होता. त्यानंतर रिझवी आघाडीवर आला. 24 फटक्यांनंतर शाहझरने 240.7 अंकांसह पहिले स्थान संपादन केले. त्याशिवाय ओंकारने 236 सह दुसरे, जितू रायने 214.1 अंकांसह तिसरे स्थान मिळवले.

महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये सिंगापूरची स्टार रायफल नेमबाज जास्मीन क्झेरने पात्रता फेरीत 419.8 अंकांसह अव्वलस्थान मिळवले तर तिची राष्ट्रीय सहकारी मार्टिना व्हेलोसोने 417.5 अंकांसह दुसरे स्थान संपादन केले. मेघनाने 416.6, पूजाने 415.3 व अंजुमने 414.1 अंकांसह अनुक्रमे तिसरे, चौथे व सहावे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश प्राप्त केला. 8 स्पर्धकांच्या अंतिम फेरीत अंजुमने पहिल्या 5 फटक्यांच्या सिरीजमध्ये सर्वेत्तम सुरुवात केली. पण, नंतर पूजाने आपला दर्जा सिद्ध करताना आघाडी मिळवली. पहिल्या 10 प्रयत्नानंतर तिने 249.8 अंक प्राप्त केले होते. अंजुमने 248.7 अंकांसह रौप्य तर व्हेलोसोने 224.8 अंकांसह कांस्यपदकाची कमाई केली. मेघनाला या गटात 183.8 अंकांवर समाधान मानावे लागले होते. या इव्हेंटमध्ये सुवर्ण जिंकणारी पूजा घाटकर ही गगन नारंग स्पोर्ट्स फाऊंडेशनशी सलग्न आहे.

स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट गटात मैराज अहमद खान, अंगदवीर सिंग बाजवा व शेराज शेख यांनी पात्रता फेरीत 125 पैकी 119 अंक मिळवत शूटऑफसह अंतिम फेरीत धडक मारली. मैराज व अंगद यांनी अनुक्रमे 5 वे व 6 वे स्थान मिळवत 6 स्पर्धकांच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

या स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारतातर्फे महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्तोल इव्हेंटमध्ये हिना सिद्धूने सुवर्ण तर पुरुषांच्या 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये दीपक कुमारने कांस्यपदकाची कमाई केली होती. तोच धडाका भारताने बुधवारी दुसऱया दिवशी देखील कायम राखला.

Related posts: