|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » नेहराच्या कारकिर्दीची विजयाने सांगता

नेहराच्या कारकिर्दीची विजयाने सांगता 

न्यूझीलंडविरुद्ध 53 धावांनी विजय, शिखर धवन-रोहितची 158 धावांची विक्रमी भागीदारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सामनावीर शिखर धवन व रोहित शर्मा यांची तडाखेबंद 158 धावांची भागीदारी आणि गोलंदाजांचा भेदक मारा या बळावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात 53 धावांनी दमदार विजय संपादन केला व डावखुरा मध्यमगती गोलंदाज आशिष नेहराच्या कारकिर्दीची विजयी सांगता देखील केली. भारताने निर्धारित 20 षटकात 3 बाद 202 धावांची मजल मारली तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडला 8 बाद 149 धावांवर समाधान मानावे लागले.

विजयासाठी 203 धावांचे आव्हान असताना किवीज फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले. त्यामुळे, विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे, असे कुठेच जाणवले नाही. चहलच्या गोलंदाजीवर लाँगऑफवरील हार्दिक पंडय़ाने आपल्या उजवीकडे झेपावत गुप्टीलची (4) खेळी संपुष्टात आणली आणि इथूनच त्यांच्या पडझडीला सुरुवात झाली. भुवनेश्वरने मुन्रोला (7) त्रिफळाचीत केले तर पंडय़ाने 28 धावा जमवणाऱया विल्यम्सनला यष्टीरक्षक धोनीकरवी झेलबाद केले. अक्षर पटेलने ब्रुस (10) व ग्रँडहोम (0) यांना सहज बाद करत न्यूझीलंडच्या गोटात आणखी खळबळ उडवून दिली. पुढे बुमराहने निकोल्स (6) व साऊदी (8) यांना बाद केले. किवीज डावात सर्वाधिक 39 धावा जमवणारा लॅथम हा चहलच्या गोलंदाजीवर पुढे सरसावून फटका लगावण्याच्या प्रयत्नात धोनीकरवी यष्टिचीत झाला.

भारतीय संघातर्फे अक्षर पटेल (4 षटकात 2/20) व यजुवेंद्र चहल (4 षटकात 2/26) या फिरकीपटूंनी प्रत्येकी 2 तर भुवनेश्वर, बुमराह व हार्दिक पंडय़ा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली, शिवाय, न्यूझीलंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील विजयाचा दुष्काळ देखील संपुष्टात आणला. यापूर्वी झालेल्या पाचही टी-20 लढतीत भारताला किवीज संघाविरुद्ध पराभव स्वीकारावे लागले होते. ती अपयशी मालिका भारताने येथे खंडित केली.

धवन-रोहितची फटकेबाजी

 तत्पूर्वी, भारतीय डावात धवन व रोहित यांनी प्रत्येकी 80 धावांचे योगदान दिले तर पंडय़ा भोपळा फोडण्यापूर्वीच बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली (11 चेंडूत 26) व महेंद्रसिंग धोनी (2 चेंडूत 7) यांनी नाबाद राहत भारताला 200 धावांचा टप्पा सर करुन दिला. आशिष नेहरासाठी हा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या लढतीनंतर निवृत्त होणार असल्याचे त्याने यापूर्वीच जाहीर केले होते.

 रोहित शर्मा व धवनची 158 धावांची खेळी सर्वोत्तम ठरलीच. शिवाय, भारतीय संघातर्फे कोणत्याही गडय़ासाठी ही सर्वोत्तम भागीदारी देखील ठरली. यापूर्वी विराट व रोहित यांनी 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 138 धावांची सर्वोच्च भागीदारी साकारली होती. तो विक्रम येथे मोडीत निघाला.

किवीज कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर रोहित शर्मा व धवन यांनी किवीज गोलंदाजांवर सातत्याने तुटून पडत आक्रमणावरच सर्वस्वी भर दिला. फिरोजशाह कोटला मैदानावरील या लढतीला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

16 धावांवर जीवदान लाभलेल्या रोहित शर्माने 55 चेंडूंच्या खेळीत 4 षटकार व 6 चौकार फटकावले तर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधीत्व करणाऱया डावखुऱया धवनने आपल्या घरच्या मैदानावर अवघ्या 52 चेंडूतच 10 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली. धवन अर्धशतकासमीप असताना जवळपास बाद होता होता बचावला तर रोहितने मात्र डावखुरा फिरकीपटू सॅन्टनेरला थेट षटकारासाठी भिरकावून देत थाटात अर्धशतक साजरे केले होते.

धवनने नंतर ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी यांना मिडविकेटच्या दिशेने काही उत्तम चौकारासाठी पिटाळून लावले. शिवाय, अन्य गोलंदाजांवर देखील आक्रमण कायम राखले. धवनला पॉईंटवरील बोल्टने तर रोहितला लाँगऑफवरील साऊदीने जीवदान दिले, ते देखील उपयुक्त ठरले. रोहितला जीवदान मिळाले त्यावेळी तर तो अवघ्या 16 धावांवर खेळत होता. नंतर थर्डमॅनच्या दिशेने साऊदीला षटकारासाठी भिरकावून दिल्यानंतर रोहितने फटकेबाजीचा प्रारंभ केला. धवनने देखील सोधीला लागोपाठ चौकार-षटकारासाठी पिटाळत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले.

पुढे, कर्णधार विराटने आपल्या बॅटीचे तडाखे देत 11 चेंडूत 3 षटकारांसह 26 धावांची आतषबाजी केली तर आपल्या पहिल्याच चेंडूवर 93 मीटर्सचा उत्तूंग षटकार खेचणारा महेंद्रसिंग धोनी 2 चेंडूत 6 धावांवर नाबाद राहिला. किवीज संघातर्फे ईश सोधीने 4 षटकात 25 धावात 2 बळी घेत सर्वात किफायतशीर पृथक्करण नोंदवले.

धावफलक

भारत : रोहित शर्मा झे. लॅथम, गो. बोल्ट 80 (55 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार), शिखर धवन यष्टीचीत लॅथम, गो. सोधी 80 (52 चेंडूत 10 चौकार, 2 षटकार), हार्दिक पंडय़ा झे. लॅथम, गो. सोधी 0 (2 चेंडू), विराट कोहली नाबाद 26 (11 चेंडूत 3 षटकार), महेंद्रसिंग धोनी नाबाद 7 (2 चेंडूत 1 षटकार). अवांतर 9. एकूण 20 षटकात 3/202.

गडी बाद होण्याचा क्रम

1-158 (धवन, 16.2), 2-158 (पंडय़ा, 16.4), 3-185 (रोहित, 19.0)

गोलंदाजी

मिशेल सॅन्टनेर 4-0-30-0, ट्रेंट बोल्ट 4-1-49-1, टीम साऊदी 4-0-44-0, कॉलिन डे ग्रँडहोम 3-0-34-0, ईश सोधी 4-0-25-2, कॉलिन मुन्रो 1-0-14-0.

न्यूझीलंड : मार्टिन गुप्टील झे. पंडय़ा, गो. चहल 4 (8 चेंडूत 1 चौकार), कॉलिन मुन्रो त्रि. गो. भुवनेश्वर 7 (8 चेंडू), केन विल्यम्सन झे. धोनी, गो. पंडय़ा 28 (24 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), टॉम लॅथम यष्टीचीत धोनी, गो. चहल 39 (36 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), टॉम ब्रुस झे. रोहित, गो. पटेल 10 (10 चेंडूत 1 चौकार), ग्रँडहोम झे. धवन, गो. पटेल 0 (1 चेंडू), निकोल्स धावचीत (विराट) 6 (7 चेंडूत 1 चौकार), सॅन्टनेर नाबाद 27 (14 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), टीम साऊदी झे. धोनी, गो. बुमराह 8 (4 चेंडूत 2 चौकार), सोधी नाबाद 7 (9 चेंडूत 1 चौकार). अवांतर 9. एकूण 20 षटकात 8/149.

गडी बाद होण्याचा क्रम

1-6 (गुप्टील, 1.3), 2-18 (मुन्रो, 3.4), 3-54 (विल्यम्सन, 9.1), 4-83 (ब्रुस, 12.4), 5-84 (ग्रँडहोम, 12.6), 6-94 (निकोल्स, 14.4), 7-99 (लॅथम, 15.3), 8-111 (साऊदी, 16.4).

गोलंदाजी

आशिष नेहरा 4-0-29-0, चहल 4-0-26-2, भुवनेश्वर 3-0-23-1, बुमराह 4-0-37-1, अक्षर पटेल 4-0-20-2, हार्दिक पंडय़ा 1-0-11-1.

पहिल्या व शेवटच्या षटकाचा मान नेहराला….

कर्णधार विराटने यावेळी आपली शेवटची टी-20 खेळणाऱया आशिष नेहराला डावातील पहिले व शेवटचे षटक टाकण्याची संधी दिली व या दिग्गज, डावखुऱया गोलंदाजाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा यथोचित समारोप झाला. कव्हर्सवरील पंडय़ाने मुन्रोचा झेल सोडल्यानंतर नेहराची पाटी कोरीच राहिली. नेहराने या लढतीत 4 षटकात 29 धावा, असे पृथक्करण नोंदवले. अर्थात, डावातील शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 6 चेंडूत 61 धावांची गरज असताना नेहरा रनअपला आला ते विजयी मुद्रेतच. या षटकात त्याने 7 धावा दिल्या आणि भारताने हा सामना 53 धावांनी जिंकला.

Related posts: