|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मागणी

यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मागणी 

वार्ताहर/ सोलापूर

मुंबई येथे आमदार प्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग कामगार शिष्टमंडळासोबत  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी केली. यावेळी आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करताना मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योग प्रतिकूल पररिस्थितीतून वाटचाल करीत असताना यंत्रमाग कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधींबाबत यंत्रमाग धारकांवर सक्तीची कार्यवाही करण्यात येत आहे असे कारखानदारांना वाटत असून त्यामुळे त्यांनी 17 दिवस संप पुकारले होते. त्यामुळे शहरामध्ये यंत्रमाग कामगार व त्यांचे कुटुंबीय दिवाळीत उपाशी राहिले त्यामुळे शहरात काळी दिवाळी साजरी करण्यात आली.

राज्याचे वस्त्राsद्योग धोरण जाहीर करण्यात आलेले असून त्यामध्ये दिनांक 2 फेब्रुवारी 2012 च्या शासन निर्णयानुसार वस्त्राsद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना कामगार कल्याण योजना, आरोग्य विमा योजना इत्यादी संबंधित विभागाच्या सहाय्याने राबविण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला होता. योजना राबविण्याकरिता आराखडा तयार करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2013 रोजीच्या शासन निर्णयानवये समिती गठीत करण्यात आली. योजनेचा आराखडा समितीकडून तयार करण्यात आला तो शासनास सादर केला आहे.

यंत्रमाग उद्योगातील कामगार हा मुख्य घटक आहे. देशातील शेती खालोखाल सर्वात जास्त रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग आहे. बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. या यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या हिताकरिता स्वतंत्र कायदा निर्माण करणे, त्यांना भविष्यनिधीचा लाभ, ईसआयचा लाभ, किमान वेतन कायद्याची पुनर्रचना, निवृत्ती वेतन, कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण, मालेगाव येथील यंत्रमाग कामगारांप्रमाणे घरकुल योजना राबविणे ही योजना कामगारांच्या हिताकरिता राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर स्थापन करण्याचे आश्वासन आ. प्रणिती शिंदे यांना दिले. यावेळी नागेश बोमडयाल, शिवाराया कवलगी, जक्कप्पागौड पाटील, संगप्पा मिरगाळे, रमेश पाटील, रविकुमार बारीक, तिरुपती परकीपंडला, समाधान हाके आदी उपस्थित होते.

Related posts: