|Thursday, October 18, 2018
You are here: Home » क्रिडा » गगन नारंगला रौप्य, राधानगरीच्या स्वप्नील कुसाळेला कांस्य

गगन नारंगला रौप्य, राधानगरीच्या स्वप्नील कुसाळेला कांस्य 

वृत्तसंस्था /गोल्ड कोस्ट :

लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेत्या गगन नारंगने रौप्य तर स्वप्नील कुसाळे व अन्नू राज यांनी प्रत्येकी एक कांस्य जिंकल्यानंतर भारताने येथील राष्ट्रकुल नेमबाजी चॅम्पियनशिपमधील आपली यशस्वी घोडदौड कायम राखली. पदकजेत्यातील स्वप्नील कुसाळे हा राधानगरी तालुक्यातील कांबळेवाडी येथील युवा नेमबाज आहे.

नारंगने पुरुषांच्या 50 मीटर्स एअर रायफल प्रोन इव्हेंटमध्ये दुसरे स्थान संपादन केले तर याच गटात स्वप्नीलने कांस्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत स्वप्नीलने 246.3 अंक नोंदवले आणि अवघ्या 1.4 गुणांच्या फरकाने तो दुसऱया स्थानी राहिला. अनुभवी अनू राजने महिलांच्या 25 मीटर्स पिस्तोल इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.

स्पर्धेतील या तिसऱया दिवसात गगन नारंग व स्वप्नील यांनी 8 स्पर्धकांच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केल्यानंतर भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आणि या उभयतांनी देखील अपेक्षापूर्ती केली. नारंगने या इव्हेंटमध्ये 60 शॉट्सनंतर 617.6 अंक नोंदवले तर स्वप्नीलने 619.1 अंकाची कमाई केली. ऑस्ट्रेलियाच्या डेन सॅम्पसनने 624.3 अंकांचा राष्ट्रकुल विक्रम नोंदवत सुवर्णपदक काबीज केले. इव्हेंटमधील तिसरा भारतीय स्पर्धक सुशील घलयला 22 प्रतिस्पर्ध्यात दहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याने 614.1 अंक मिळवले.

अंतिम फेरीत स्वप्नीलने दणकेबाज सुरुवात केली. दहाव्या शॉटनंतर तो आघाडीवर देखील होता. पुढे 24 शॉट्सच्या फायनलमध्ये 18 शॉट्सनंतर ऑस्ट्रेलियाच्या डेनने आघाडी घेतली. डेनने 247.7 अंकांसह सुवर्ण मिळवले. ‘प्रचंड वारा असल्याने अर्थातच प्रतिकूल स्थिती होती. अगदी बिनचूक वेळी लक्ष्य साधण्याचा प्रयत्न करणे संयमाची परीक्षा घेणारे होते’, अशी प्रतिक्रिया 2010 राष्ट्रकुल सुवर्णजेत्या डेनने यावेळी दिली.

महिला 25 मीटर्स पिस्तोल अंतिम फेरीत हिना सिद्धूसह तीन भारतीयांनी स्थान संपादन केले. पण, येथे अन्नू राज सिंग अधिक प्रभावी ठरली. पात्रता फेरीत तिने 578 गुण कमावले. राष्ट्रीय सहकारी राही सरनोबतने देखील समान अंक मिळवले. पण, काऊंटबॅकमध्ये ती तिसरी आली. हिनाने 571 अंकांसह पाचवे स्थान संपादन केले. अंतिम फेरीत अन्नू राजने सर्व अनुभव पणाला लावत 5 पैकी पहिल्या दोन प्रयत्नात प्रत्येकी कमाल 5 गुण मिळवले आणि इथेच तिची सरशी झाली. ललिता यौहलेस्काया व इलेना गॅलियाबोविच यांनी मात्र 10 व्या व शेवटच्या सिरीजमध्ये अनुक्रमे 32 व 35 अंकांसह आघाडी प्राप्त केली.

Related posts: