|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » किरकोळ कारणातून सांगलीत हमालाचा खून

किरकोळ कारणातून सांगलीत हमालाचा खून 

प्रतिनिधी /सांगली :

बुधवारी रात्री लिंबू मागण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी काठी, लाथाबुक्क्मया आणि विटांनी मारहाण करून सांगलीत सागर सुरेश कराळे (वय 38 रा. वाल्मिकी हौसिंग सोसायटी शिवाजीमंडईजवळ) याचा खून करण्यात आला. गुरूवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तरूण भारत व्यायाम मंडळाच्या मागील बोळात पैलवान दारूच्या दुकानाजवळ घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल केला असून आकाश राजेंद्र कराळे (वय 25 रा. वाल्मिकी हौसिंग सोसायटी) याने फिर्याद दिली आहे.

वाल्मिकी हौसिंग सोसायटीमध्ये राहणारा रिक्षाचालक मुजावर, त्याचा मुलगा अलफाज आणि दोन महिलांसह चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, कराळे हा शिवाजी मंडईत भाजीपाला आणि अन्य साहित्याची हमाली करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. आनंद चित्रमंदिराजवळ असणाऱया पैलवान देशी दारूच्या दुकानात दररोज दारू पिण्यासाठी जात असे. बुधवारी रात्रीही तो दारू पिण्यासाठी गेला होता. शेजारी राहणारा अमजदही दारू पिण्यासाठी आला होता. अमजदने त्याला लिंबू मागितला. पण त्याने लिंबू दिला नाही. त्यामुळे दोघात वाद झाला. अमजदला सागरने मारहाण केली होती. दोघात वाद झाल्याने दारू दुकानातील अन्य लोकांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. त्याने घरी जाऊन कुटूंबियाना माहिती सांगितली.

गुरूवारी सकाळी सात वाजताच अमजद, त्याचा मुलगा अलफाज आणि घरातील अन्य दोन महिलांनी दारू दुकानाजवळच गाठले. दारू पिऊन बाहेर येताच चौघांनी सागरला काठी आणि विटांनी डोक्यात मारण्यास सुरूवात केली. त्यामध्ये शरीराने आधीच अशक्त असणाऱया सागरचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चौघेही पळुन गेले. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. परिसरात चौकशी केली. सागरचा खून अमजद, त्याचा मुलगा आणि दोन महिलांनी केला असल्याचे समजले. सायंकाळपर्यंत पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. पण रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती.

Related posts: