|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण अवलंबितांची पाळी येथे धरणे

खाण अवलंबितांची पाळी येथे धरणे 

वार्ताहर /उसगांव :

खनिज उत्खननावर मर्यादा घालण्याची याचिका गोवा फाऊंडेशनचे क्लाऊड आल्वारिस यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने, त्यांच्या या कृतीचा निषेध म्हणून ट्रक मालकांनी एक दिवसांचे धरणे धरले. बॉम्बे रोड, पाळी येथे गुरुवारी आयोजित केलेल्या या धरणे कार्यक्रमात उत्तर गोवा ट्रक मालक संघटना, ट्रक ओनर्स असोसिएशन फॉर गोवा मायनिंग, मशीन मालक संघटना व खनिज व्यवसायावर अवलंबितांचा त्यात समावेश होता.

यावेळी बोलताना मशिन मालक संघटनेचे अध्यक्ष संदीप परब यांनी सांगितले की, गोव्यातील खाण उद्योगावर मर्यादा आल्याने आधीच ट्रक व्यवसाय अडचणीत आला आहे. उत्खनन मर्यादा 30 मिलियन टन करण्याची गरज आहे. पण ही मर्यादा 20 मिलियन टनापर्यंत आली आहे. मात्र उत्खनन मर्यादा 12 मिलियन टनापर्यंत तसेच शक्य झाल्यास ती 5 मिलियन टनापर्यंत खाली आणावी, अशी याचिका गोवा फाऊंडेशनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसे झाल्यास खनिज व्यवसाय बंद होण्याचा धोका आहे. आल्वारिस हे पर्यावरणप्रेमी असल्यास केवळ खाणी विरोधात कृती न करता इतर ठिकाणी चाललेल्या बेकायदेशीर कृतीविरोधात तयांनी आवाज उठवावा. खाण व्यवसायावर अवलंबितांचे पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा.

उत्तर गोवा ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष सुरेश देसाई म्हणाले, ट्रक मालक, कामगारवर्ग यांचा विचार न करता गोवा फाऊंडेशनने खनिज उत्खनन कमी करण्यासाठी जी याचिका दाखल केली आहे, ती अन्यायकारक आहे. सध्या गोवा राज्यात 89 खाणी चालू आहेत. उत्खनन मर्यादा कमी केल्यास हा व्यवसाय चालणे शक्य होणार नाही. हा व्यवसाय बंद झाल्यास मोठय़ा खाण कंपन्या अन्य व्यवसायाकडे वळतील. पण त्यावर अवलंबून असलेले ट्रक मालक व इतर  अवलंबितांवर उपासमारीची वेळ येईल. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे आम्हाला आर्थिकदृष्टय़ा शक्य नाही. म्हणून धरणे कार्यक्रमातून आल्वारीस यांच्या कृतीचा निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.