|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » म.गांधींनंतर हमिद दलवाईंचे विचार विचार करायला लावणारे

म.गांधींनंतर हमिद दलवाईंचे विचार विचार करायला लावणारे 

हमिद दलवाई माहितीपटाच्या दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांचे मत

समाजापर्यंत विचार पोहोचवण्यासाठीच माहितीपट,

नसरूद्दीन शहा, अमृता सुभाष यांच्या उपस्थितीत चित्रिकरणास मिरजोळीत प्रारंभ

प्रतिनिधी /चिपळूण

महात्मा गांधींनंतर ज्येष्ठ साहित्यिक हमिद दलवाई यांचे विचार विचार करायला लावणारे असल्याने त्यांचे हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्या जीवनावरील माहितीपट तयार करीत असल्याचे मत या माहितीपटाच्या दिग्दर्शिका व ज्येष्ठ अभिनेत्या ज्योती सुभाष यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

हमिद दलवाई यांच्या जीवनावरील माहितीपटासाठी त्यांच्या जन्मगावी मिरजोळी येथे शुक्रवारपासून ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शहा, अभिनेत्या अमृता सुभाष यांच्या उपस्थितीत चित्रिकरणास प्रारंभ झाला आहे. हमिद दलवाई यांचे साहित्य प्रभावी असल्याने आजही मोठमोठय़ा कार्यक्रमांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्य पुढे सुरू रहावे, म्हणून त्यांच्या पत्नी मैरूनिसा दलवाई यांनी हमिद दलवाई फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जातात. यातूनच काही वर्षांपूर्वी मिरजोळी येथे हमिद दलवाई स्मृती भवन साकारण्यात आले आहे. या भवनातही अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नी मैरूनिसा दलवाई यांचे निधन झाले आहे.

दलवाई यांचे कार्य अखंड ठेवण्यासाठी दलवाई कुटुंब नेहमीच पुढाकार घेते. यातूनच हा माहितीपट तयार केला जात आहे. नसरूद्दीन शहा स्वतः दलवाई यांची भूमिका साकारणार असून त्यांना अमृता सुभाष व ज्योती सुभाष साथ देत आहेत. शुक्रवारी खासदार हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत या चित्रिकरणास प्रारंभ झाला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून दलवाई यांच्या निवासस्थानाबरोबरच स्मृतिभवन येथे, तर सायंकाळी कालुस्ते येथे चित्रिकरण झाले. शनिवारीही अनेक ठिकाणी चित्रिकरण होणार आहे.

या तीन अभिनेत्यांचा खासदार हुसेन दलवाई, दलवाई जमातीचे चेअरमन जियाउद्दीन दलवाई, अर्बन बँकेचे संचालक रहिमान दलवाई यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंनिसचे हमिद दाभोळकर, मिरजोळीच्या सरपंच कनिज दलवाई, ज्येष्ठ सदस्य अहमद दलवाई, माजी तंटामुक्त अध्यक्ष खालीद दलवाई, माजी उपसरपंच कमलाकर आंब्रे, खलील दलवाई, हमिद दलवाईंच्या ज्येष्ठ कन्या रूबिना दलवाई, बशीर दलवाई, अजमल दलवाई, कबीर दलवाई, अन्वर दलवाई आदी उपस्थित होते.

या दरम्यान पत्रकारांशी बोलताना ज्योती सुभाष म्हणाल्या की, हमिद दलवाईंंचे सामाजिक कार्य, लिखाण स्फूर्तीदायक आहे. धर्माच्या संबंधातील त्यांचे विचार भावनेच्या पलिकडेचे आहेत. आपण राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या असून दलवाई यांनी आपल्या सातारा-रेहमतपूर गावाला भेट दिली होती. त्यामुळे त्यांच्याबाबत आपल्याला बरीच माहिती आहे. त्यामुळे त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा माहितीपट काढत आहोत. खासदार हुसेन दलवाई, अहमद दलवाई यांनी त्यांच्या अनेक आठवणी आपल्याला सांगितल्या असून त्याचाही या माहितीपटात समावेश करून घेतला जाणार असल्याचे ज्योती सुभाष यांनी सांगितले.

मिरजोळीतच पहिले प्रसारण

हा माहितीपट पूर्ण झाल्यानंतर त्याचे पहिले प्रसारण मिरजोळीतच होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम भव्य-दिव्य स्वरूपात केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.