|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उपसरपंच निवडीतही सरपंचच निर्णायक!

उपसरपंच निवडीतही सरपंचच निर्णायक! 

समसमान मते मिळाली तरच मता†िधकार

सदस्य म्हणून मताधिकार नाही

ग्रामविकास विभागाने काढले परिपत्रक

प्रतिनिधी /देवरुख

उपसरपंच निवडीत उमेदवारांना समसमान मते पडली तरच थेट निवडून आलेल्या सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, असे ग्रामविकास विभागाने 1 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. यामुळे आता थेट सरपंचाला एक मत की दोन मते या मतमतांतरावर पडदा पडला आहे.

थेट सरपंच निवडणूक झाल्यानंतर आता उपसरपंचपदाच्या निवडीची लगबग सुरु झाली आहे. अनेक ग्रामपंचायतीवर थेट सरपंच निवडीमुळे सरपंच एका पक्षाचे आणि बहुमत दुसऱया पक्षाचे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांचे काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत सरपंचाच्या मताच्या जोरावर उपसरपंचही आपल्याच गटाचा केला जाईल, असे दावे केले जात आहेत. सरपंच यांच्या मताच्या अधिकाराबाबत मतमतांतरे, उलटसुलट चर्चा सुरु होती.

थेट निवडून आलेले सरपंच हे ग्रामपंचायतीचे पदसिध्द सदस्य आहेत. त्यांना उपसरपंच निवडीत मताचा अधिकार असणार आहे. त्यामुळे हे एक मत आणि समसमान मते झाली तर निर्णायक मत अशी एकूण दोन मते देण्याचा अधिकार आहे. असा युक्तीवाद केला जात होता. तर उपसरपंच निवडीत सरपंच यांना मत देण्याचा अधिकार नाही. समान मते पडली तरच सरपंचाला निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, असा दावा अन्य काहीजण करत होते. यामुळे सध्या या निवडणुकीतील सरपंचांच्या मतावरुन दोन प्रवाह निर्माण झाल्याने शासनाकडे अनेक जिल्हा परिषदेने मार्गदर्शन मागवले होते.

ग्रामविकास विभागाने 1 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून या विषयाचा घोळ संपवला आहे. उपसरपंच निवडणुकीच्यावेळी सरपंचांना पदसिद्ध सदस्य म्हणून मतदानात भाग घेता येणार नाही. मात्र या निवडणुकीत समसमान मते पडल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, असे या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे.

त्याचबरोबर कलम 30 अ-1 अ अन्वये निवडून आलेला सरपंच हा पदसिध्द सदस्य असेल आणि पोटकलम 33 मध्ये सुधारणा करुन पोटकलम 6 (4) अन्वये उपसरपंचाच्या निवडीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा हक्क असेल आणि सरपंच पद रिक्त असल्यास या निवडणुकीचा निकाल पीठासीन अधिकारी निर्धारित करील. अशास्थितीत त्याच्या समक्ष चिठ्ठी टाकून निकाल देण्यात येईल, असेही या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे. हे परिपत्रक शासनाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांच्या स्वाक्षरीचे आहे. त्यामुळे सरपंच नसलेल्या शेरंबे ग्रामपंचायतीत उपसरंपच निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला आहे.

Related posts: