|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कलाकार घडवणे हे कला अकादमीचे ध्येय

कलाकार घडवणे हे कला अकादमीचे ध्येय 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा आणि कला या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून केवळ कार्यक्रम करणे हे कला अकादमीचे ध्येय नाही तर त्यातून कलाकार घडवणे हा हेतू असल्याचे प्रतिपादन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले. सुरश्री केसरबाई केरकर संगीत संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

पणजीतील कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात काल शुक्रवारी 37 व्या केरकर संमेलनाचा शानदार शुभारंभ झाला. रविवारीपर्यंत हा संगीत संमेलनाचा कार्यक्रम चालणार असून त्यात गोव्यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

सुरश्रींनी गोव्याचे नाव उज्ज्वल केले

मंत्री गावडे यांनी पुढे सांगितले की, केसरबाई केरकर या अंत्रुज महालातील होत्या. तो महाल म्हणजे कलाकारांची खाण आहे. या महालाने अनेक गुणी कलाकार दिले आणि त्यांनी गोव्याचे नाव देशात तसेच परदेशातही उज्ज्वल केले. सुरश्रींची संगीतावरील निष्ठा, शिस्त अतिशय कडक होती. त्यांची गायनशैली तर अतिशय सुंदर होती, असे सांगून गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्याबाबत काढलेल्या गौरवोद्गारांचा उल्लेखही गावडे यांनी यावेळी केला.

मधूर आवाजात त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. तशीच ती या महोत्सवातील कलाकारांनीही जिंकावीत अशा शब्दात गावडे यांनी सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आणि रसिकांचेही आभार मानले.

गावडे यांनी केसरबाई केरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच समई प्रज्वलित करून या संमेलनाचे उद्घाटन केले. कला अकादमीचे सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर, रवींद्र आमोणकर, सतीश गवस, अजय नाईक, जॉन डिसिल्वा आदी मान्यवर मंडळी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होती.

पं. कशाळकर यांची मैफल रंगली

पंडित उल्हास कशाळकर यांच्या शास्त्राrय गायनाने संमेलनाची सुरुवात झाली. त्यांचे गायन रंगले आणि रसिकांना भावले. त्यांना तबल्यावर सुरेश तळवलकर, हार्मोनियमनवर सिद्धेश बिचोलकर यांनी साथसंगत केली. तानपुऱयावर डॉ. शशांक मक्तेदार, सचिन तेली, विक्रांत नाईक यांनी साथ दिली. त्यानंतर राकेश चौरासिया (बासरी) व जयंती कुमारेश (वीणा) यांच्यात जुगलबंदी होऊन ती रंगली. रसिकांनी या संगीत संमेलनास भरघोस प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

Related posts: