|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मोपा प्रकल्पग्रस्तांना नियुक्तीपत्रे प्रदान

मोपा प्रकल्पग्रस्तांना नियुक्तीपत्रे प्रदान 

प्रतिनिधी/ पणजी

पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळ प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल शुक्रवारी नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. येत्या जानेवरीपासून त्यांना नोकरीत रुजू करुन घेण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. एकूण 15 कुटुंबातील प्रत्येकी एक मिळून 15 जणांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. त्याशिवाय प्रत्येक कुटुंबाचे 800 चौरस मिटर जागेत पुनर्वसन करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश 11 ऑक्टोबर 2017 रोजी जारी झाला आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

मोपा येथील प्रस्तावित विमानतळाच्या जागेतील प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात कायम नोकरी देण्याचे आश्वासन सरकारने पाळले आहे. हा विमानतळ बांधून चालविणाऱया जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. या कंपनीने 15 मोपावासियांना कायम नोकरी दिली आहे. काल शुक्रवारी सचिवालयाच्या सभागृत झालेल्या नियुक्तीपत्रांच्या वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासोबत पेडण्याचे आमदार तथा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर, सीएचे सचिव डब्लू व्ही. आर. मूर्ती, जीजीआयएएलचे सीईओ आर. व्ही. शेषन उपस्थित होते.

मोपा विमानतळाचा विचार 1994 पासूनचा

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढे बोलताना म्हणाले की 1994 सालात गोव्यात दुसरा विमानतळ उभारण्याचा विचार जन्माला आला होता. केपे व पेडणे या दोन तालुक्यात जागा निश्चित करण्यात आली होती. पेडणे तालुक्यातील मोपा येथील जागा योग्य असल्याने त्या जागेला अंतिम स्वरुप देण्यात आले होते. नंतर  विमानतळ उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. काहीजणांनी गरज नसताना मोपा विमानतळाला विरोध करून अडचणी निमार्ण करण्याचाही प्रयत्न केला होता.

विमानतळानंतर होणार विकासाचे प्रत्यक्ष दर्शन

नव्याने होणाऱया या विमानतळामुळे पेडणे तालुक्याचा आणि पर्यायाने गोव्याचा आर्थिकदृष्टय़ा विकास कसा होणार हे आपण आता सांगणार नाही, तर त्याचे दर्शन प्रत्यक्ष गोमंतकीयांना वेळेवर होईल. भाजप सरकारने ठिकठिकाणी रस्ते, पूल उभारून गावांना व तालुक्यांना जाडण्याचे काम केले आहे. आज ग्रामीण भागातील युवकसुध्दा पणजीपर्यंत नोकरीला येताना दिसत आहेत. मोपा विमानतळ झाल्यानंतर पेडण्यातील युवकांना पेडण्यात नोकऱया उपलब्ध होणार आहेत, असे पर्रीकर यांनी सांगितले.

मोपानंतर दाबोळीही सुरुच राहणार

मोपा विमानतळ झाल्याने दोबोळी विमानतळ बंद पडणार असा काही जणांचा समज आहे. मात्र तसे काही होणार नाही. कारण गोव्यात विमाने येण्याची संख्या मोठय़ाप्रमाणात वाढली असून त्यासाठी दाबोळी विमानतळ कमी पडत आहे. त्यामुळे दोन्ही विमानतळ सुरु राहणार आहे. त्याचा फायदा गोमंतकीयांना होणार आहे. त्यासाठी रस्ते सुसज्ज करण्याचे काम सुरु आहे. रल्वे वाहतुकही जोडण्यात येणार आहे. केवळ एका तासात गोव्याच्या कुठल्याही भागापर्यंत पोचण्याची व्यवस्था होणार आहे. एकूणच मोपा विमानतळ हा गोव्याचा लॅण्डमार्क ठरणार असल्याचेही पर्रीकर म्हणाले.

मोपा विमानतळ पेडण्याची शान ठरणार : आजगांवकर

मोपा विमानतळ हा पेडण्याची शान ठरणार आहे. हा विमानतळ होण्यासाठी मोपावासियांनी मोठा त्याग केला आहे. विशेषतः ज्या भागात विमानतळ होत आहे त्या भागातील धनगरवस्तीने, असे पेडण्याचे आमदार तथा पर्यंटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले. त्यांच्या त्यागाची परतफेड करण्याचे सरकारने त्यांना वचन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ज्यांची घरे गेली आहेत त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, त्यानुसार त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, असेही आजगावकर म्हणाले. या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. मोपा गावातील ज्या लोकांच्या जमिनी विमानतळासाठी गेलेल्या आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी आजगांवकर यांनी केली आहे.

भाऊबंदानाही कुठेतरी काम द्यावे : वरक

आमचे आमदार बाबू आजगावकर यांनी आमच्यासाठी खूप काही केले आहे. आमच्या प्रत्येक घरातील एका सदस्याला नोकरी मिळवून देण्यापर्यंत ते आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करीत असल्याचे प्रकल्पग्रस्त बया बी. वरक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमच्या कुटुंबातील इतर सदस्य म्हणजे आमचे भाऊबंद ते सध्या बेकार आहेत. जमीन गेल्याने त्यांच्याकडे कामाधंद्याचे कोणतेही साधन राहिलेले नाही. म्हणून त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करावा. एखाद्या कंपनीत किंवा इतर कुठेतरी त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना काम मिळवून द्यावे, अशी मागणीही वरक यांनी केली आहे.

Related posts: