|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा लाईट इन्फंट्रीमुळे देशाचे लष्करी सामर्थ्य प्रबळ

मराठा लाईट इन्फंट्रीमुळे देशाचे लष्करी सामर्थ्य प्रबळ 

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठा लाईट इन्फंट्रीच्या शौर्य परंपरेमुळे देशाचे लष्करी सामर्थ्य प्रबळ राहिले आहे. यापुढील काळातही मराठा लाईट इन्फंट्री आपल्या जाज्वल्य इतिहासाची परंपरा कायम राखेल, असा विश्वास भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केला.

येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये शुक्रवारी मराठा लाईट इन्फंट्रीच्या दोन बटालियन्ससाठी ध्वजगौरव प्रदान सोहळा पार पडला. या सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या लष्करप्रमुखांनी मराठा लाईट इन्फंट्रीचा उचित शब्दात गौरव केला. तसेच मराठा जवानांच्या शौर्याला अभिवादन केले.

मराठा लाईट इन्फंट्रीच्या 23 मराठा आणि 24 मराठा या दोन तुकडय़ांना हा ध्वजगौरव प्रदान करून नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी या शानदार सोहळय़ाचे आयोजन केले होते. मराठा लाईट इन्फंट्री केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांच्या नेतृत्वाखाली तुकडीने शानदार पथसंचलन करून  सोहळय़ाचे वैभव वाढविले.

इन्फंट्री केंद्रातील तळेकर मैदानावर हा शानदार सोहळा पार पडला. या सोहळय़ासाठी विशेष अतिथी म्हणून लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत (युवायएसएम., एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएमएडीसी) आणि मराठा लाईट इन्फंट्रीचे प्रमुख ले. जनरल पी. जे. एस. पन्नू (एव्हीएसएम., व्हीएसएम.) आदी उपस्थित होते.

जनरल बिपीन रावत आपल्या भाषणात म्हणाले, भारतीय सेना सर्व प्रकारच्या दहशतवादाचा बिमोड करण्यास समर्थ आहे. मराठा लाईट इन्फंट्रीसारख्या सैनिकी सामर्थ्यामुळे हे शक्मय झाले आहे. मराठा इन्फंट्रीच्या नव्या तुकडय़ांना ध्वजगौरव प्रदान करण्याचा सन्मान मला लाभल्याने सार्थक भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी 23 मराठा तुकडीतर्फे मेजर सौरभ मेडक आणि 24 मराठा तुकडीतर्फे मेजर करण जोसेफ यांनी ध्वज सन्मान स्वीकारला. या सन्मान सोहळय़ाला विशेष अतिथी म्हणून खासदार डॉ. प्रभाकर कोरे, खासदार सुरेश अंगडी, ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी या मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या शानदार समारंभाला मराठा इन्फंट्रीचे वरि÷ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित होते.