|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरीसाठी दोनिवडे, हातिवले गावातील भूसंपादनाच्या हालचाली

रिफायनरीसाठी दोनिवडे, हातिवले गावातील भूसंपादनाच्या हालचाली 

वार्ताहर /राजापूर

तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्तांसह शेतकरी, मच्छीमार जनतेचा तीव्र विरोध असतानाही शासनाने परिसरातील गावांमध्ये भूसंपादनासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. नाणार परिसरातील सुमारे 15 गावांमधील जागा प्रकल्पासाठी संपग्नादित होत असताना आता त्यामध्ये आणखी काही गावांची भर पडणार आहे. रिफायनरी प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी यांची निवासस्थाने तसेच प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱया प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी हातिवले, दोनिवडे परिसरातील जागा संपादित करण्याच्या हालचाली शासकीय स्तरावर सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार पंचक्रोशीमध्ये रिफायनरी हा जगातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाला स्थानिक जनतेतून मोठय़ा प्रमाणात विरोध केला जात आहे. मात्र शासन हा प्रकल्प होण्यासाठी हर तऱहेचे प्रयत्न करत आहे. सध्या या प्रकल्पाला विरोध होत असताना प्रकल्पाची जनसुनावणी करून घेण्याचे सोपस्कार शासन स्तरावर सुरू आहेत. मात्र जनसुनावणी दरम्यानही हा प्रकल्पच आम्हांला नको असल्याचे प्रकल्पग्रस्त तसेच प्रकल्पबाधित जनता टाहो फोडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र शासन जनतेच्या विरोधाला न जुमानता कार्यवाही करत असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकल्पासाठी कारशिंगे, सागवे, विल्ये, दत्तवाडी, पालेकरवाडी, कात्रादेवी, कारिवणे, चौके, नाणार, उपळे, पडवे, साखर, तारळ, गोठीवरे या गावातील सुमारे 1300 एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. सध्यस्थितीत प्रकल्पाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली असून जनसुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. सुरूवातीला प्रकल्पासाठी 15 गावांतील जमिनी संपग्नादित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी आता त्यामध्ये आणखी काही गावांची भर पडण्याची शक्यता आहे.

रिफायनरी प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱयांच्या निवासस्थानासह प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी हातिवले व दोनिवडेसह लगतच्या अन्य काही गावातील जमिनी संपादित करण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू आहेत. अद्याप या बाबतची अधिसूचना जारी करण्यात आली नसली तरी या गावातील जमिनी प्रकल्पासाठी घेण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे आता रिफायनरी प्रकल्पबाधित गावांच्या संख्येत भर पडणार आहे.

Related posts: