|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पालकमंत्र्यांसह मनपा पदाधिकारी नागरिकांच्या दारी

पालकमंत्र्यांसह मनपा पदाधिकारी नागरिकांच्या दारी 

प्रतिनिधी/ सोलापूर

पक्षांतर्गत वादास तुर्तास पूर्णविराम देत महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱयांनी समस्या सोडविण्यासाठी थेट नागरिकांच्या दारापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द पालकमंत्रीही नागरिकांच्या दारी पोहोचल्याने नागरिकांना पुन्हा दिवाळी आल्यासारखेच वाटत असल्याची चर्चा आहे.

सोलापूरकरांनी मोठय़ा विश्वासाने भाजपाच्या हाती सत्ता दिली. महापालिकेत सत्तेवर येवून दहा महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही पालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत वादामुळे शहराचा विकास होत नव्हता. सहकारमंत्री देशमुख व पालकमंत्री देशमुख यांच्यातील वादाचा परिणाम महापालिकेत दिसू लागला होता. महापालिकेतही भाजपमध्ये दोन गट पडल्याने नागरिकांची कामे नाही तर पदाधिकाऱयांच्या वादामुळेच शिस्तीच्या भाजपाची सर्वत्र नाचक्की सुरु होती. इतकेच नव्हे महापालिकेच्या कारभारातही ढिसाळपणा आला होता. पदाधिकाऱयांच्या वादाचा लाभ विरोधक घेत होते. पक्षांतर्गत वाद खूपच पेटला आणि पक्षाची बदनामी सुरु झाली होती.

सभागृह नेता यांनी महापालिकेत आठवडय़ातून पाच दिवस जनता दरबार सुरु केला. पदाधिकारी आपल्या दारी हा उपक्रम सुरु करून नागरिकांच्या समस्या निदान ऐकून घेण्यास तरी सुरुवात केली. जनता दरबाराच्या नियोजनातही पदाधिकाऱयांमध्ये वाद दिसून आला. शिस्तीच्या भाजपाला बेशिस्त लागल्याचे वृत आणि सालपूरकरांमधून नाराजी उमटू लागल्याने भाजपाची चिंता वाढली. पक्षांतर्गवादाची दखल घेत वरिष्ठांनी झापल्यानंतर गेल्या काही दिवसात महापालिकेतील वादात थोडी शिथिलता आल्याचे †िदसत आहे.

शनिवारी सकाळी सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱयांनी महापौरांच्या प्रभाग 8 मध्येच पदाधिकारी आपल्या दारीची फेरी काढत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे पालकमंत्री स्वतः नागरिकांच्या दारी आल्यामुळे लोकांनाही कौतुक वाटत होते. कारण लोकप्रतिनिधी फक्त निवडणुका लागल्यानंतर मते मागायला येतात इतकेच लोकांना माहिती असते. पालकमंत्री स्वतः आले आणि ते देखील महापौरांच्या प्रभागात, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपाचे सध्या केंद्र व राज्यात सरकार असल्याने सोलापूरचा विकास नक्कीच होईल, अशी भाबडी अपेक्षा सोलापूरकरांना वाटते आहे. सत्तेचा वापर करुन भाजपाने महापालिकेच्या माध्यमातून शहर विकासाची कामे करताना शहरवासियांना मूलभूत व पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी चर्चा नागरिकांमधून होती.

पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

सोलापूर शहरवासिय वर्षाची पाणीपट्टी भरतात पण त्यांना 12 महिन्यातून चारच महिने पाणी मिळते. भाजपाने महापालिका बजेटमध्ये पाणीपट्टी 50 टक्के माफ व यूजर चार्जेस संपूर्ण माफ करण्याचा ठराव केला. बजेट होवून चार महिने लोटले तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. नुकतेच पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु पालकमंत्र्यांच्या आदेशालाच प्रशासनाने केराची टोपली दाखवलेली आहे.